नागपूर : शहरात सोमवारी झालेल्या दंगलीनंतर हिंसाचारग्रस्त भागांतील तणावाची स्थिती अद्याप कायम आहे. अकरा वस्त्यांमध्ये संचारबंदी कायम ठेण्यात आली आहे. आंदोलनात धार्मिक प्रतीक असलेली चादर पेटवल्याचा आरोपाप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या आठ कार्यकर्त्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर लगेचच त्यांना जामीनही देण्यात आला. तर फहीम खान नावाची व्यक्ती दंगलीची सूत्रधार असल्याचा दावा करीत पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली.

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी बुधवारी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही हिंसाचारग्रस्त महाल भागातील भालदारपुरा, हंसापुरी, चिटणवीसपुरा, नवाबपुरासह अन्य वस्त्यांमध्ये संचारबंदी कायम ठेवण्यात आली. या भागातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद होत्या तर रस्ते ओस पडले होते. ११ वस्त्यांमध्ये शहर बससेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पोलीस आयुक्तांनी बुधवारी या भागाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रफिती पाहून पोलिसांनी आतापर्यंत ५१ लोकांना अटक केली. यात दंगलीचा सूत्रधार फहीम खानचा समावेश आहे. दंगलीच्या दिवशी खान हा पोलिसांना निवेदन देण्यास गणेशपेठ ठाण्यात जमावासह गेला होता. दरम्यान, नागपूरमधील दंगलीचा महाराष्ट्र एटीएसही स्वतंत्रपणे तपास करणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

महिला पोलिसाचा विनयभंग

सोमवारी रात्री दंगल उसळल्यावर भालदारपुरा भागात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी दंगेखोरांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवारी भाजप आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडून दोषींवर कारवाईची मागणी केली होती.

Story img Loader