लोकसत्ता टीम
बुलढाणा: मेहकर मध्ये दोन गटात काल रात्री उशिरा झालेल्या संघर्षा नंतर संचारबंदी लागू करण्यात आली असून मेहकर नगर परिषद हद्द सील करण्यात आली आहे.मेहकर पालिका हद्दीत कुणालाही प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.दरम्यान मेहकर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून आज सोमवारी , २५ नोव्हेंबर दुपारी १२ पर्यंत दोन्ही गटाच्या २५ जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालेल्या मेहकर नगरीत तणाव पूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी आज ‘लोकसत्ता’ सोबत बोलताना सांगितले आहे. प्रकरणी दोन्ही भिन्न धर्मीय गटातील २५ जणांना अटक करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
२३ नोव्हेंबरला मेहकर विधानसभा मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागला असून मोठा उलटफेर झाला आहे. शिवसेना ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात विजयी झाले. मागील तीस वर्षांपासून येथे असलेले खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमूलकर यांचे वर्चस्व मोडून काढण्यात ठाकरे गटाला यश मिळाले आहे.यामुळे निकाल लागल्यापासूनच खदखद निर्माण झाली होती व अदृश्य राजकीय तणाव दिसून आला.
आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाणीचा इशारा आणि देवळीत इतिहास घडला…
वाहने जाळली, दगडफेकही
काल २४ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा याचे पर्यवसान दोन गटातील जातीय संघर्षांत झाले. २४ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा दोन समुदायात दंगल झाली. काही गाड्या पेटवण्यात आल्या असून दगडफेकही करण्यात आली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागला. मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर व अन्य ठिकाणाहून पाचारण करण्यात आलेल्या पोलीस दलाने तातडीने कारवाई करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. मेहकर नगरपरिषद सीमा सीलबंद करण्यात आली आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज २५ नोव्हेंबर रोजी सकाळ पासूनच पोलिसांनी अटक मोहीम सुरू केली. आज दुपार पर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली असल्याचे एसडीपीओ प्रदीप पाटील यांनी सांगितले.
आणीखी वाचा-‘मुख्यमंत्री एकच…’ शिंदेंच्या फलकांमुळे महायुतीतील छुपा संघर्ष आता…
दरम्यान रात्रीपासूनच मेहकर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी( महसूल) रवींद्र जोगी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्याचे आदेश जारी केले आहे.काल रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली आहे. मेहकर शहरात पोलिसांचा अतिरिक्त पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. मेहकर शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून बाहेरच्या नागरिकांना शहरात प्रवेश करण्यास देखील मनाई करण्यात येत आहे.दरम्यान समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहेत.