पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा तीसरा आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा दुसरा अर्थसंकल्प उद्या, गुरुवारी संसदेत सादर होणार असून या अर्थसंकल्पात रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्याचे धाडसी निर्णय घेण्यात येणार की, जुन्याच प्रकल्पांना नव्याने नामकरण करून पुढे रेटल्या जातील. याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
सुरेश प्रभू यांच्या पहिला अर्थसंकल्प काटकसरीचा होता. परंतु आता देशात ‘मेक इन इंडिया’ माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना देशाची एकता, अखंडता मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि विकासगंगा देशाच्या कानाकोपऱ्यात नेणाऱ्या रेल्वेला नवसंजीवनी दिले जाईल, याकडे लक्ष लागले आहे. मेट्रो रेल्वेचे काम प्रगतीवर आहे. त्याचबरोबर नागपूरचा मेट्रो रिजन म्हणून विकास करण्याची योजना आहे. त्यामुळे पंचवीस किलोमीटर परिघात वाढणाऱ्या या शहराला नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरून दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नईसाठी थेट गाडय़ांची मागणी आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी अजनी, इतवारी रेल्वे स्थानकावर अधिकाधिक गाडय़ांना थांबे देण्याची आवश्यकता आहे. सर्वाधिक प्रवासी वाहतूक नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे यादरम्यान आहे. या मार्गावर आणखी गाडय़ा सुरू करावे लागणार आहे. परंतु या मार्गावर रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात सर्वात मोठी अडचण रेल्वेमार्गाची आहे. सेवाग्राम ते नागपूर मार्गावर एकही नवीन गाडी सुरू करणे कठीण बाब झाली आहे. या मार्गावर तीसरा मार्ग टाकण्यात येत आहे. या कामाला गती देण्यात सोबतच चौथ्या रेल्वेमार्ग बांधण्याबाबत विचार झाला पाहिजे. नागपूर शहर वर्धा मार्गाच्या आजूबाजूला वाढत आहे. हे बघता अजनी रेल्वे स्थानकाचा विकास करून फलाटांची संख्या वाढणे आणि येथून मुंबई आणि दक्षिणकडे येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ांना थांबे देणे प्रवाशांच्या सोयीचे ठरणार आहे.
रेल्वे झोन हवे
भौगोलिकदृष्टय़ा मध्यवर्ती भागात असलेल्या नागपूर शहरात रेल्वे झोन स्थापन करून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशात रेल्वेचे जाळे विणून विकास साधण्याची संधी आहे. रेल्वे झोन आणि रेल्वे भरती मंडळ ही दोन प्रमुख कार्यालय नागपुरात आल्यास रेल्वेत विदर्भ, मराठवाडय़ातील टक्क्यात वाढ होण्यास मदत होईल. यासाठी सहा विभाग असलेल्या मध्य-दक्षिण रेल्वेचे नांदेड विभाग, मध्य रेल्वेचा नागपूर विभाग आणि दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचा नागपूर मिळून झोन स्थापन करण्याची जुनी मागणी आहे. नागपुरात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. तो निर्णय पुढच्या रेल्वेमंत्र्यांन बदलला होता. गेल्या अर्थसंकल्पात नागपुरात नीर कारखाना स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी जमीन देखील निश्चित करण्यात आली. परंतु प्रकल्प रखडला आहे. इतवारी-नागभीड रेल्वे मार्ग ब्रॉडगेज, वडसा-देसाईगंज ते गडचिरोली नवीन रेल्वेमार्ग, वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गाची संथगती, बडनेरा येथे कोच दुरुस्ती कारखाना मालडब्यांचा कारखाना, गडचांदूर-आदिलाबाद, बल्लारशा-सूरजागड मार्ग प्रकल्प प्रलंबित आहेत.
* भुसावळ- नागपूर पॅसेंजर गाडीचा वेग वाढवण्यात यावा. सामान्य डब्यांची संख्या वाढवण्यात यावी.
* नागपूर- गोंदिया, नागपूर- चंद्रपूर, नागपूर- अकोला, नागपूर- शेगाव, नागपूर- आदिलाबाद, नागपूर पाढुर्णा- इटारसी या मार्गावर लोकल सुरू करावी .
* अजनी-अमरावती इंटरसिटी दिवसातून दोनदा चालवावी.
* विदर्भ, सेवाग्राम, महाराष्ट्र एक्सप्रेसला आठ व हावडा-पुणे, हावडा-अहमदाबाद या गाडय़ांना सहा सामान्य डबे जोडावे.
* नागपूर, अजनी आणि सर्व स्थाननकावर फूट अंडर ब्रिज उभारण्यात यावे.

Story img Loader