देवेश गोंडाणे
करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सरकार आगामी शैक्षणिक वर्षांत शालेय अभ्यासक्रमात आणि तासिकांमध्ये कपात करण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी याचा आधीच अंदाज घेत पुस्तकांची विक्री केली आहे. पालकांना संदेश पाठवून पूर्ण अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची विक्री करत आपला आर्थिक हेतू साध्य केला असता. मात्र, आता या विकत घेतलेल्या पुस्तकांचे काय करायचे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून राज्यातही सर्वाधिक रुग्ण आहेत. अशा स्थितीत देशात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण देण्याची सरकारची तयारी आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकार आगामी शैक्षणिक वर्षांत शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. मात्र, सरकार अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार करत असले तरी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी खासगी शाळांनी पालकांना संदेश पाठवून पुस्तकांची विक्री केली आहे. ही पुस्तकं संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असल्याने अभ्यासक्रम कमी झाल्यास या विकत घेतलेल्या पुस्तकांचे काय? असा प्रश्न पालकांसमोर आहे. खासगी शाळांनी पुस्तकांचाही व्यवसाय सुरू केला आहे.
सीबीएसईच्या नियमाला डावलून एका विद्यार्थ्यांला वर्षांकाठी किमान पाच हजारांच्या पुस्तकांची विक्री केली जाते. या व्यावसायिक हेतूने शाळांनी अभ्यासक्रम कमी होण्याचा पूर्वअंदाज घेत पालकांच्या हातात पूर्ण अभ्यासक्रमाची पुस्तके देत आपली पोळी शेकून घेतल्याचा आरोपही केला जात आहे.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) व केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड यांना जून महिन्यात दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या सूचनाही रमेश पोखरियाल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमात एक समान आशय असलेला भाग रद्द करावा, असा प्रस्ताव शिक्षण तज्ज्ञांनी सरकारसमोर मांडला आहे. त्यानुसार कपात करून नवीन शैक्षणिक सत्रांचा २०२०-२२ अभ्यासक्रम तयार करणार आहे. मात्र, याआधीच शाळांनी पुस्तकांची छपाई करून विक्रीही केली आहे.