सुसुन्द्री येथे उद्या उद्घाटन
दुष्काळग्रस्त किंवा तप्त वातावरणात एक थेंब पाण्याची आवश्यकता नसतानाही भरघोस पीक देणारे सीताफळ विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकऱ्यांसाठी पर्वणी होऊ शकते. या सीताफळासारख्या शैक्षणिक, राजकीय, भौगोलिकदृष्टय़ा दुर्लक्षित फळाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या २५ सप्टेंबरला नागपूर जिल्ह्य़ातील सुसुन्द्री या फळरोप वाटिकेत सीताफळ महोत्सव कळमेश्वर आणि सावनेर तालुका कृषी अधिकारी यांच्यावतीने महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यासाठी आमदार सुनील केदार यांनी पुढाकार घेतला आहे. महोत्सवाचे उद्घाटन केदार यांच्या हस्ते होणार आहे.
मराठवाडय़ातील दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि स्थलांतरणाचे नवीन प्रश्न गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहेत तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि उन्हाळ्यात आग ओकणारा सूर्य या दोन्ही गोष्टी सर्वानाच माहिती आहेत. या दोन्ही भागातील वातावरण सीताफळाला अतिशय पोषक आहे. मात्र, आतापर्यंत सीताफळ दुर्लक्षित राहिल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या क्षेत्रात गेल्या २००३पासून संघटना बनवून काम करणारे महाराष्ट्र सीताफळ महासंघाचे सचिव श्याम गट्टाणी म्हणाले, सीतेचा जन्म मातीतून आणि मृत्यूही मातीत झाला. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या राज्यात ती दुर्लक्षितच राहिली. तशीच सीताफळाची गत आहे. जानेवारी ते जून या तप्त वातावरणात पाण्याच्या एका थेंबाची आवश्यकता नसते तरी या फळाविषयी पाहिजे तेवढी जागृती नाही. मात्र, महासंघाच्या प्रयत्नांमुळे २००३मध्ये २७ हजार हेक्टर सीताफळाचे लागवड क्षेत्र असताना आमच्या प्रयत्नांमुळे ते ६५ हजार हेक्टर झाले आहे. यासंबंधीच्या १२ राज्यव्यापी परिषदा घेतल्या असून नागपूर जिल्ह्य़ात अशा प्रकारे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे.
मुंबईत ११० ते १२० रुपये सीताफळ घेतले असून सामान्य माणसाला ते १५० रुपये किलोपर्यंत मिळाले आहेत. याची लागवड केल्यास विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना वार्षिक ५० हजार रुपयांची प्राप्ती होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी दोन लाख रुपये वार्षिक कमावत असला तरी विदर्भ व मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना ५० हजारही खूप वाटतात.
सीताफळाविषयी गेल्या तीन वर्षांपासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुलढाणा येथील विस्तार व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून लागवडीसंबंधी प्रशिक्षण दिले जाते. केंद्रावर संशोधन होत नसले तरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये याविषयाची जागृती केली जाते, अशी माहिती केंद्राचे संचालक नितीन गुप्ता यांनी दिली.
* सीताफळाची लागवड करणारे नारायण महानोर येणार.
* नागपूर जिल्ह्य़ातील ४०० ते ५०० शेतकरी हजेरी लावणार.
* राज्यभरातील तज्ज्ञ महोत्सवासाठी आमंत्रित.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा