वाशिम : मागील तीन टर्मपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार भावना गवळी वाढत्या क्रमाने निवडून येत होत्या. यावेळी देखील त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती. परंतु, ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील महाले यांना उमेदवारी देण्यात आली. अखेर राजश्री पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. सहाही विधानसभा मतदारसंघात युतीचे आमदार असताना राजश्री पाटील यांचा पराभव युतीसाठी धोक्याची घंटा ठरणारा आहे.
एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. मात्र येथे पहिल्यांदा भावना गवळी यांचे वडील पुंडलिक राव गवळी यांनी खिंडार पाडून शिवसेनेचा भगवा फडकवला. पुढे त्यांच्या कन्या भावना गवळी यांनी विजयाची एकही संधी सोडली नाही. आधी वाशिम व नंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांना धूळ चारून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडानंतर खासदार भावना गवळी या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्या होत्या. त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिममधून खासदार भावना गवळी याच संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होत्या.
हेही वाचा – फडणवीसांकडून राजीनाम्याच्या तयारीचे पडसाद उमटणे सुरू, समर्थकांनी सामूहिक…
लोकसभा निवडणूक जाहीर होताच खासदार भावना गवळी यांनीही आपणच संभाव्य उमेदवार म्हणून दावेदारी ठोकली. निवडणुकीची तयारीही केली. त्यांच्या विरोधातील सर्वेचा अहवाल आणि मतदारांच्या नाराजीचे कारण पुढे करून ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. युतीचे या मतदारसंघात राजकीय प्राबल्य होते. पालकमंत्री, माजी मंत्री आणि सहा आमदार सोबत असतानाही त्यांचा पराभव झाला. सहापैकी केवळ पुसद मतदारसंघातून राजश्री पाटील यांना आघाडी मिळाली तर पाच विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांनाच आघाडी मिळाली, हे विशेष.
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य
राजश्री पाटील यांनी कडवी झुंज दिली असली तरी शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातच राजश्री पाटील यांच्यापेक्षा संजय देशमुख यांना सर्वाधिक मतदान झाले. येथे राजश्री पाटील यांना ९७ हजार ५२० तर संजय देशमुख यांना १ लाख ६ हजार १८७ मतदान झाले.