चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर ‘सायबर’ हल्ला झाला. ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ प्रणालीद्वारे खातेदारांच्या खात्यात रक्कम वळती केली जात असताना सायबर हल्लेखोरांनी संपूर्ण यंत्रणा हॅक करून ३३ ग्राहकांच्या खात्यांतील ३ कोटी ७० लाख ६४ हजार ७४२ रुपये हरियाणा येथील अज्ञात व्यक्तीच्या खात्यात वळते केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेचे प्रभारी व्यवस्थापक राजू पांडूरंग दर्वे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेमार्फत ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ प्रणालीसाठी नागपुरातील ट्रस्ट फिनटेक लि. या कंपनीसोबत ‘कोर बँकिंग सिस्टिम’करिता करार केला आहे. यासाठी येस बँकची यंत्रणा वापरण्याकरिता येस बँक व ट्रस्ट फिनटेक यांच्यात करार आहे. याच माध्यमातून चंद्रपूर जिल्हा बँकेचे सर्व ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ व्यवहार होत असतात. धनादेवी मजूर सहकारी पतसंस्थेचे ग्राहक इम्रान पठाण यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गौतमी एन्टरप्रायझेस यांच्या खात्यात १३ लाख २६ हजार ६८० रुपयांचा ‘आरटीजीएस’ करण्यासाठी ७ फेब्रुवारीला अर्ज केला होता. मात्र ‘आरटीजीएस’ केलेली रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात जमाच झाली नाही. १० फेब्रुवारीला पठाण यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयात तक्रार दिली. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

बँकेने ट्रस्ट फिनटेक लि. यांचे प्रतिनिधी राकेश कवाडे यांना माहिती दिली. कवाडे यांनी बँकेतील यंत्रणा तपासली असता ७ आणि १० फेब्रुवारीला विविध सहकारी पतसंस्थांच्या शाखेतील ग्राहकांसोबतच इरतही ग्राहकांचे ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ व्यवहारांच्या प्रणालीमध्ये गडबड दिसून आली. ज्या खात्यांत रक्कम जमा व्हायला हवी होती तिथे रक्कम जमा न होता हरियाणा येथील त्रयस्थ व्यक्तीच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे दिसून आले.

हरियाणातील अज्ञात व्यक्तीच्या खात्यात रक्कम वळवली

अज्ञात व्यक्तीने बँकेची संपूर्ण यंत्रणा हॅक करून हा गैरव्यवहार केला आणि बँकेच्या ३३ ग्राहकांच्या खात्यातून ३ कोटी ७० लाख ६४ हजार ७४२ रुपये लंपास केले. ही संपूर्ण रक्कम हरियाणा येथील एका अज्ञात व्यक्तीच्या खात्यात वळवण्यात आली. बँकेने या प्रकरणाची तक्रार ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग’ या ‘पोर्टल’वर केली आहे. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली.

एक कोटींपेक्षा अधिकची रक्कम मिळवण्यात यश

तक्रारीनंतर एक कोटींपेक्षा अधिकची रक्कम मिळविण्यात पोलिसांना यश आले. मात्र, उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित तिसरा व्यक्ती अर्थात खातेदार हा हरियाणा येथील आहे. त्यामुळे हरियाणा येथे विशेष पथक पाठवले जाईल. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपासाची सूत्रे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.