नागपूर : समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्यांमध्ये इंस्टाग्राम, फेसबूक आणि यु-ट्यूबवर फालोअर्स वाढविणे, सबस्क्राईबर वाढविणे, लाईक्स वाढविणे आणि शेअर वाढवून देण्याच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी राज्यभरात जाळे विणले आहे. या जाळ्यात राज्यातील हजारो युवक अडकले असून सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीसंदर्भात राज्यभरात तक्रारी दाखल होत आहेत.

समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनेक जण धडपड करीत असतात. तर समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले सदस्य यू-ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादींच्या माध्यमातून पैसे कमवित असतात. ‘सोशल मीडिया इंफ्ल्युएन्सर’ असलले युवक-युवती तर लाईक्स, सबस्क्राईबर, शेअर आणि फालोअर्स वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या (मनोरंजक आणि माहितीदर्शक) चित्रफिती टाकत असतात. समाजमाध्यमांवर जेवढे जास्त लाईक्स, सबस्क्राईबर किंवा फॉलोअर्स असतील तेवढे जास्त पैसे गुगल किंवा संबंधित कंपनीच्या अॅपच्या माध्यमातून कमविता येतात. त्यामुळे अनेक जण पैसे कमविण्यासाठी धडपड करीत असतात.

आणखी वाचा-काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी चेन्नीथला म्हणाले, “आता एकच लक्ष्य, महाराष्ट्र सत्ताबदल”

हीच बाब हेरुन सायबर गुन्हेगारांनी यू-ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर लाईक्स, सबस्क्राईबर आणि फॉलोअर्स वाढविण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आहेत. अनेकांच्या भ्रमणध्वनीवर या संदर्भात संदेश येतात. यू-ट्यूब किंवा फेसबुकवर जाहिराती येतात. त्यात फालोअर्स वाढविण्यासाठी ५०० रुपये, चित्रफितीला लाईक्स वाढवून देण्यासाठी १००० आणि यू-ट्यूबवर सबस्क्राईबर वाढवून देण्यासाठी प्रतिहजार सबस्क्राईबरसाठी १० हजार असे आमिष दाखविण्यात येते. अॅपच्या माध्यमातून पैसे कमविण्यासाठी अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. या माध्यमातून सायबर गुन्हेगार राज्यभरात अनेकांना लाखोंनी फसवणूक करीत आहेत.

‘रिअॅलिटी शो’मुळे वाढले आकर्षण

इंस्टाग्राम आणि फेसबुकवर रिल्स बनविणारे राज्यभरात प्रसिद्ध होत आहेत. समाजमाध्यमावरील लाईक्स आणि फालोअर्सच्या बळावर काही जणांची तर चक्क टीव्हीवरील रिअॅलिटी शोसाठी निवड झाली आहे. त्यामुळे अनेकांनी पैसे देऊन फॉलोअर्स आणि लाईक्स वाढवून घेण्याचा सपाटा लावला आहे. असे अनेक सदस्य सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले आहेत.

आणखी वाचा-स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…

असे आहेत दर

१ हजार इंस्टा फॉलोअर्स – १००० रुपये
१० हजार इंस्टा फॉलोअर्स – ८ हजार रुपये
१० हजार फेसबुक लाईक्स – ५ हजार रुपये
१ हजार यू-ट्यूब सबस्क्राईबर – १० हजार रुपये

पोलिसांचे म्हणणे काय?

समाजमाध्यमांवरील लाईक्स-फालोअर्स वाढवून देणाऱ्या बनावट जाहिरातीवरील लिंकवर क्लिक करू नका. सबस्क्राईबर वाढविण्यासाठी सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकू नका. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा, असे आवाहन गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले आहे.