नागपूर : एखाद्ये खासगी प्रतिष्ठान, शासकीय कार्यालय किंवा कंपनीचा संपर्क क्रमांक ‘इंटरनेट’वरून शोधत असाल तर तुम्ही नक्कीच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण, सायबर गुन्हेगारांनी आता अनेक कंपन्यांचे बनावट संकेतस्थळ तयार करणे सुरू केले आहे. त्यावरील क्रमांकावर संपर्क करणाऱ्या ग्राहकांना सायबर गुन्हेगार जाळ्यात ओढून फसवणूक करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
राज्यात सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर गुन्हेगार नवीन क्लृप्त्यांचा वापर खात्यातून पैसे परस्पर उकळण्यासाठी करीत आहे. सध्या सायबर गुन्हेगारांनी रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळासह शासकीय कार्यालये तसेच खासगी सेवा देणाऱ्या कंपन्यांची बनावट संकेतस्थळे तयार केली आहे. त्या बनावट संकेतस्थळाची रचना मूळ कंपन्यांसारखी असते. त्यामुळे गुगलचा वापर करून संपर्क क्रमांक शोधणाऱ्या अनेक ग्राहकांना सायबर गुन्हेगार जाळ्यात ओढतात. काही रक्कम ‘ऑनलाईन’ टाकण्यास सांगितले जाते. तसेच ‘एटीएम कार्ड-क्रेडिट कार्ड’ची माहिती ‘ऑनलाईन’ टाकण्यास बाध्य केले जाते. ग्राहकाने माहिती दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले जातात. ग्राहकांना काही मिनिटातच खात्यातून पैसे काढल्याचा संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त होतो. ग्राहक गोंधळलेल्या अवस्थेत असतो. परंतु, पोलिसांपर्यंत तक्रार देईपर्यंत सायबर गुन्हेगाराने ग्राहकाचे खाते रिकामे केलेले असते. त्यामुळे गुगलवरून ग्राहक प्रतिनिधींचे किंवा इतर संपर्क क्रमांक शोधताना काळजी बाळगणे आवश्यक आहे.
हेही वाचा…भंडारा : नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द, शिवीगाळ; व्हायरल ऑडियो क्लिपने खळबळ
गुगलवरुन टॅक्सी बुकिंग भोवले
टॅक्सी बुक करण्यासाठी गुगलवरुन संपर्क क्रमांक शोधल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी एका युवकाची एक लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी पीडित अमोल भोलानाथ चौरे याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. अमोलने गुगलवर टॅक्सी कंपन्यांचे नंबर शोधले. या दरम्यान त्यांना शिवशक्ती कार रेंट्स ही वेबसाईट दिसली. त्यांनी वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि मोबाईल नंबर नोंदविला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी शिवशक्ती कार रेंट्सच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करुन युवकाच्या खात्यातून एक लाख रुपये परस्पर काढले.
हेही वाचा…नागपूर: अपघातात जखमी विद्यार्थ्याला तातडीने शस्त्रक्रियेसाठी हलवले…४८ विद्यार्थ्यांची…
अशी घ्यावी खबरदारी
ग्राहक प्रतिनिधी किंवा इतर क्रमांक हवा असल्यास अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संपर्क क्रमांक किंवा ग्राहक प्रतिनिधींचा दूरध्वनी क्रमांक पडताळून घ्यावा. सेवा किंवा वस्तू मिळवण्यासाठी ‘ऑनलाईन’ पैसे भरू नये. ‘एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड’ची माहिती देऊ नये. अन्यथा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असते.
‘इंटरनेट’वरून शोधलेल्या ग्राहक प्रतिनिधींशी संपर्क साधल्यास तो क्रमांक सायबर गुन्हेगाराचा असू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी बनावट संकेतस्थळापासून सावध रहावे. ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करावी. लोहित मतानी (पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा.)