अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरल्याने हजारो लोक रस्त्यावर आले आहेत. एकीकडे असे वेदनादायी चित्र असताना दुसरीकडे सायबर गुन्हेगार या पूरग्रस्तांच्या वेदनांचे भांडवल करून दानदात्यांना लुटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

काही सायबर गुन्हेगार प्रसारमाध्यमांवर ‘पूरग्रस्त मदत निधी’ नावाने  लिंक प्रसारित करून मदतनिधी पाठवण्याचे आवाहन करीत आहेत. त्यासाठी  याचना करणाऱ्यांचे छायाचित्र वापरले जात आहे. कुणी मोठय़ा मनाने मदत केलीच तर ती रक्कम  थेट सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जमा होत आहे. देशभरातून अनेक जण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येत आहेत. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांच्या टोळय़ांकडून घेतला जात आहे.  सायबर गुन्हेगारांनी काही बनावट संकेतस्थळही तयार केले असून त्यावरही पूरग्रस्त मदत निधी नावाने पैसे मागितले जात आहेत. त्यामध्ये काही बँक खात्याची माहिती देण्यात आली आहे.

भावनांचे भांडवल

सायबर गुन्हेगार लोकांना मदत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सायबर गुन्हेगार पूरस्थितीत सापडलेल्या वस्त्यातील लहान मुलांचे जेवण आणि बिस्किट्स घेताना काढलेल्या, महिला धान्याच्या पाकिटांसाठी रांगेत असलेल्या भावनिक छायाचित्रांचा वापर करीत आहेत. 

अनेकदा सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांना मोबाईलवर लिंक किंवा संदेश पाठवून मदत करण्याचे भावनिक आवाहन करतात. मात्र, अशा संदेश किंवा लिंकवर क्लिक करू नका.  मदतनिधी देताना स्वयंसेवी संस्था, युवा संघटना  अधिकृत असल्याची खात्री करा. कोणत्याही वैयक्तिक खात्यावर पैसे पाठवू नका.  समाजमाध्यमांवरून केलेल्या खोटय़ा आवाहनावर विश्वास ठेवू नका.

सुकेशिनी लोखंडे, पोलीस अधिकारी, सायबर क्राईम.