बुलढाणा : सायबर गुन्हेगारांनी आता आयुष्याच्या संध्याछायेत राहणाऱ्या सेवानिवृत्तीधारकांना लक्ष्य केल्याचे दिसते आहे. निवृत्तांशी संपर्क साधून निवृत्तीवेतन संचालनालयातून बोलत असल्याचे भासवून त्यांचा ‘ओटीपी’ मिळवायचा आणि खात्यातील संपूर्ण रक्कम क्षणार्धात ‘गायब’ करायची, अशी पद्धत या निष्णात सायबर गुन्हेगारांनी अवलंबिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

सायबर गुन्हेगारांकडून निवृत्ती वेतनधारकांचे जीवन प्रमाणपत्र ‘ऑनलाइन अपडेट’ करण्यासाठी संपर्क केला जातो. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्याकडे निवृत्तीवेतनधारकांचा संपूर्ण ‘डेटा’ असतो. नियुक्तीची तारीख, सेवानिवृत्तीची तारीख, पीपीओ क्रमांक (पेन्शनरचा पेमेंट ऑर्डर क्रमांक), आधार कार्ड क्रमांक, कायमचा पत्ता, ईमेल आयडी, सेवानिवृत्तीवर मिळालेली रक्कम, मासिक पेन्शन, वारस या अद्यायावत माहितीसह संपर्क करण्यात येतो. याद्वारे निवृत्तीवेतनधारकाला समोरची व्यक्ती निवृत्तीवेतन संचालनालयाशी संबंधित आहे, असे भासविले जाते. निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र व ‘जीवन सन्मान पत्र’ अद्ययावत करण्यासाठी ‘ओटीपी’ मागितला जातो.

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

निवृत्तीवेतनधारकांनी तो सांगितला की, अज्ञात गुन्हेगारांना निवृत्तीवेतनधारकाच्या बँक खात्यावर थेट प्रवेश मिळतो. यामुळे खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम इतर बनावट बँक खात्यांमध्ये त्वरित हस्तांतरित करण्यात येते. यामुळे आयुष्यभर परिश्रम करून कमावलेली व उतारवयात आपलं सर्वकाही भागविणारी रक्कम क्षणार्धात गायब होते.फसवणूक टाळायची असेल तर निवृत्तीवेतनधारकांनी आपला ओटीपी क्रमांक कुणालाही सांगू नये. फोनवर जास्त माहिती न देता थेट कार्यालयातच माहिती देऊ, असे स्पस्ट सांगावे. तुमची सजगता आणि दक्षताच तुम्हाला फसवणुकीपासून वाचवू शकते.

हेही वाचा : १३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणारा ‘टायगर’ अखेर जेरबंद

संचालनालय कधीही फोन करीत नाही

अनेक गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्यांची उकल करणारे बुलढाणा सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांनी यासंदर्भात सांगितले की, संचालनालय पेन्शनधारकाला त्यांचे ‘जीवन हयातीचे प्रमाणपत्र, ‘जीवन सन्मान पत्र ‘ ऑनलाइन अपडेट’ करण्यासाठी कधीही संपर्क करत नाही. संचालनालयाला भेट देऊन जीवन प्रमाणपत्र वैयक्तिकरित्या अद्ययावत करणे हे निवृत्तीवेतनधारकांचे कर्तव्य आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber criminals now target pensioners otp online fraud alert buldhana tmb 01