अमरावती : सायबर लुटारू आता नागरिकांची फसवणूक करण्‍यासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्‍त्‍या वापरत असून अशाच एका प्रकरणात येथील व्‍यक्‍तीने ३ लाख रुपये अवघ्‍या काही सेकंदात गमावले. सायबर लुटारूने पाठविलेल्‍या ‘लिंक’वर ‘क्लिक’ क‍रताच या व्‍यक्‍तीच्‍या बँक खात्‍यातून २ लाख ९९ हजार ९९७ रुपये परस्‍पर अन्‍य खात्‍यात वळते झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीकृष्‍णपेठ येथील अजय बिहारीलाल अग्रवाल (५९) यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्‍या विरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> दहावी परीक्षेच्या भीतीने ‘तो’ रेल्वेगाडीत बसला अन..

एका अज्ञात आरोपीने अग्रवाल यांना कॉल करून आपण एचडीएफसी बँकेतून बोलत असल्‍याचे सांगितले. बँक खात्‍याला पॅनकार्ड जोडण्‍याची आणि केवायसी करण्‍याची आजची शेवटची तारीख असून तसे न केल्‍यास आपल्‍याला बँकेचे व्‍यवहार करण्‍यास अडचण निर्माण होईल, अशी भीती आरोपीने दाखवली. केवायसी आणि पॅनकार्डची संलग्‍नता ही प्रक्रिया अत्‍यंत सोपी असून त्‍यासाठी केवळ बँकेने पाठवलेल्‍या लिंकवर आपल्‍याला क्लिक करावे लागेल, अशी सूचना भामट्याने अग्रवाल यांना केली. पलिकडून अग्रवाल यांच्‍या मोबाईलवर एक लिंक पाठवण्‍यात आली. त्‍या लिंकवर क्लिक करताक्षणी त्‍यांच्‍या खात्‍यातून २.९९ लाख रुपये डेबिट झाल्‍याचा संदेश त्‍यांच्‍या मोबाईलवर धडकला. फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. सायबर लुटारूंनी बँकेशी नामसाधर्म्‍य असलेल्‍या लिंक तयार केल्‍या असून केवायसीच्‍या नावाखाली या लिंकवर क्लिक करण्‍यास नागरिकांना भाग पाडले जाते आणि त्‍यांची क्षणात आर्थिक फसवणूक केली जाते. या सायबर लुटारूंपासून सावध राहण्‍याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber fraud news man loses rs 3 lakh after clicking on a whatsapp link sent by cyber criminals mma 73 zws