नागपूर : सीबीआय, ईडी, मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईचा धाक दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका महिलेची ४.२८ लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी मुनिबा अलिम (३३) रा. अवस्थीनगर, गिट्टीखदानच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. 

गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुनिबा अलिम यांना २२ मे रोजी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तुमचे फेडेक्सचे पार्सल मुंबईवरून तायवानला जात असताना कस्टम विभागाने ते थांबविले आहे, असे समोरील व्यक्तीने सांगितले.

हेही वाचा >>> नागपूर: मोबाईल हरवला? काळजी नको, इथे द्या तक्रार

आपण कुठलेही पार्सल ऑर्डर केले नाही, असे मुनिबा यांनी सांगितले असता समोरील व्यक्तीने कस्टम विभागातील वरिष्ठ अधिकारी अजय सिंग बोलतील, असे सांगून आणखी एका व्यक्तीला फोन दिला. त्या व्यक्तीने स्काइप आयडीवरून मुनिबा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा व सीबीआय नमूद असलेली काही कागदपत्रे दाखविली. त्यात ईडीचादेखील लोगो होता. मुनिबा यांना प्रशासकीय प्रक्रियेची फारशी माहिती नसल्याने त्या या एजन्सीजचे नाव ऐकून घाबरल्या. त्यांनी आरोपींनी पाठविलेल्या लिंकवर बॅंक खात्याचे तपशील दिले. पुढील दीड दिवसांत आरोपींनी त्यांच्या खात्यावरून ४.२८ लाख रुपये दुसऱ्या खात्यांमध्ये वळते केले. आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुनिबा यांनी सायबर सेलमध्ये तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader