अकोला : सध्याच्या डिजिटल युगात विविध समाज माध्यमांचा वापर चांगल्या व वाईट कार्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होऊन मोठा अनर्थ देखील घडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता पोलीस सतर्क झाले असून सोशल मीडियावर ‘सायबर पेट्रोलिंग’ केले जात आहे. समाज माध्यमांचा वापर करताना तुम्ही देखील आक्षेपार्ह पोस्ट टाकत असाल तर वेळेस सावध व्हा, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल.

आजच्या युगात इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून केले जातात. आर्थिक व्यवहार, बँकिंग, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय व जनसंपर्क आदींचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. इंटरनेटच्या माध्यमाने मानवी जीवन सुलभ झाले, हे जितके खरे तितकेच याच्या वापराबाबतच्या अपुऱ्या माहितीने ते धोकादायक देखील ठरू शकते. इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर नागरिकांनी, विद्यार्थी वर्गाने, युवा पिढीने सोशल मिडीयाचा चांगला वापर करावा तसेच सत्यता न पडताळता कोणत्याही पोस्ट, फोटोज, व्हिडीओ इतरत्र शेअर करू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

सायबर सेलने गेल्या वर्षभरात सोशल मिडीयावर पडताळणी करून फेसबुक चार, एक्सवरच्या ३२, इंस्टाग्राम ४९ अशा एकुण ८५ आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यात आल्या. त्यापैकी ४१ आक्षेपार्ह पोस्ट वगळण्यात आल्या आहेत. तसेच त्यामध्ये धार्मिक भावना दुखावणाऱ्या, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, राजकीय आक्षेपार्ह पोस्ट, गुंडगिरी करणारे रिल्स, ३०२, ३०७, भाई, भाईगिरी, हातात तलवार, पिस्तुल, शस्त्र घेऊन रिल्सचा समावेश होता.

हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ तर…

समाज माध्यमात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच सोशल मिडियावर प्रसिध्दी मिळविण्यासाठी काही तरूण वर्ग, विद्यार्थी हे हातात तलवार, पिस्तुल, शस्त्र घेवुन रिल्स बनवत पोस्ट करतात.  या पोस्ट करणाऱ्या चार जणांविरूध्द अकोला पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. सोशल मीडियाचा चांगला वापर करण्यात यावा, तसेच कोणाचीही भावना दुखावल्या जाईल किंवा जाती, धर्माक तेढ निर्माण होईल अशाप्रकारचे पोस्ट, फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करू नये, असे आवाहन अकोला पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. सायबर पेट्रोलिंगमध्ये आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला.

Story img Loader