अकोला : विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर फसवणूक करणारे सर्वसामान्यांना जाळ्यात ओढत असतात. आता सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. ‘पीएम किसान एपीके’ नावाच्या फसव्या लिंकद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेतली जात असल्याचे धक्कादायक प्रकार घडत असल्याचे समोर आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सावधगिरी बाळगावी व कुठलीही अनाहूत लिंक उघडू नये, अशा सूचना निर्गमित केल्या आहेत.

प्रलोभने दाखवून किंवा बनावट लिंक पाठवून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फायदा घेण्यासाठी ऑनलाइन फसवणूक करण्याचे नवनवीन फंडे सायबर चोरट्यांनी शोधले. फसवणुकीसाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहेत. गेल्या काही काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यूपीआयद्वारे पेमेंट करताना वापरकर्त्यांना अज्ञात लिंकवर क्लिक करून त्यांची माहिती देऊन मोठ्या प्रमाणात पैसे गमवावे लागले. या फसवणुकीत गुन्हेगार आपल्या बँक खात्यात प्रवेश करून किंवा खोट्या ऑफरद्वारे पैसे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करतात. फिशिंग ईमेल, समाज माध्यमे, मोबाइल फोनवरील एसएमएस संदेश, बनावट तंत्रज्ञान समर्थन फोन कॉल, अनधिकृत खरेदी आदींच्या माध्यमातून गुन्हेगार ऑनलाइन फसवणूक करीत असतात. आता फसवणूक करण्यासाठी लिंकचा आधार घेतला जात आहे. फसव्या लिंकला टच केल्यानंतर मोबाइल हॅक होतो व ‘पीएम किसान एपीके’ अशी किंवा तत्सम लिंक शेतकऱ्यांच्या मोबाइलवर येते. ती उघडताच मोबाइल हॅक होतो. मोबाइल लिंक असलेल्या बँक खात्यातून पैसे काढले जातात, अशा स्वरुपाच्या घटना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये घडल्या आहेत.

यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चुकून आपली फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांना कळवावे किंवा सीम कार्ड ताबडतोब काढून घ्यावे. अशी लिंक उघडल्यामुळे काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीची तक्रार करण्यास किंवा उपाययोजना करण्यास विलंब झाल्यास आर्थिक नुकसान भरून निघणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी व अशी लिंक मोबाइलवर आल्यास उघडू नये, अनावधानाने ती लिंक उघडल्यास फसवणूक टाळण्यासाठी किंवा फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Story img Loader