नागपूर : सध्या राज्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारांची हिम्मत वाढली असून सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यापर्यंत आणि क्लास वन अधिकाऱ्यांपासून चक्क न्यायधीशांपर्यंत सायबर गुन्हेगाराच्या टार्गेटवर आहेत. नागपुरात असाच एक प्रकार उघडकीस आला असून सायबर गुन्हेगारांनी चक्क एका न्यायाधीशांनाच गंडवले आहे. त्या न्यायधीशांची १३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केली असून या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या स्किम काढून फसवणुकीचे जाळे फेकले. त्यात संबंधित एका न्यायाधीश एका नातेवाईकाच्या माध्यमातून अडकले. एका जवळच्या नातेवाइकाच्या माध्यमातून त्यांना फाल्कन इन्व्हॉईस डिस्काउंट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मबाबत माहिती कळाली. संबंधित नातेवाईक चार ते पाच वर्षांपासून गुंतवणूक करत होते व चांगला नफा मिळतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायाधीशांनीदेखील गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून सुरुवातीला २४ हजार रुपये गुंतविले. कंपनीने ४८ दिवसांनंतर त्यांना २४ हजार रुपये मुद्दल आणि नफ्याची अतिरिक्त रक्कम बँक खात्यात परत केले. त्यानंतर न्यायाधीशांनी ५० हजार रुपये गुंतविले.
६ जानेवारी रोजी ५२ दिवस पूर्ण झाल्यावर त्यांच्या बॅँक खात्यात मुद्दल रकमेसह नफा म्हणून काही रक्कम खात्यात आली. त्यामुळे न्यायाधीशांचा फाल्कन प्लॅटफॉर्मबाबत विश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी फाल्कनच्या त्यांच्या खात्यातून विविध कंपन्यांच्या इन्व्हॉईसमध्ये १३ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. ३ फेब्रुवारी रोजी त्यांनी हैदराबाद येथील लाइफस्टाइलच्या इन्व्हॉईसमध्ये एक लाख रुपये गुंतविले. परंतु फाल्कनच्या खात्यात डील रक्कम जमा झालीच नाही. त्यांनी फाल्कनशी संपर्क केला असता कुणीच फोन उचलला नाही.
हेल्पलाइनवरदेखील काहीच प्रतिसाद मिळाला नाही. न्यायाधीशांनी त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क केला असता त्यांचे फोनदेखील कुणीच उचलत नव्हते. फाल्कनने अनेक गुंतवणूकदारांना अशा पद्धतीने गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच न्यायाधीशांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फाल्कन इन्व्हॉईस डिस्काउंटचा संचालक अमरदीप कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या सायबर गुन्हेगारांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करणे सुरु केले आहे.
सर्वाधिकपणे एखाद्याच्या मोबाईलवर लिंक पाठवणे किंवा व्हायरस असलेली फाईल्स पाठवण्याची पद्धत वापरल्या जात आहे. लिंकवर क्लिक केल्यास सायबर गुन्हेगार संपूर्ण बँक खाते रिकामे करीत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे साबयर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.