अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : दिवाळी सण तोंडावर असताना बाजारपेठेसह ऑनलाइन माध्यमातून मोठय़ा प्रमाणात ‘दिवाळी ऑफर’ आणि ‘फेस्टिव्हल सेल’ सुरू होतो. त्याचवेळी ‘दिवाळी ऑफर’ या गोंडस नावाने सायबर गुन्हेगार सक्रिय होतात. अर्ध्यापेक्षा कमी किंमत किंवा एकावर एक मोफत अशी अनेक आमिष दाखवून सणासुदीत सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळय़ात ओढतात. त्यामुळे खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
दिवाळी सण आला की बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. अनेक जण नवनवीन वस्तू खरेदी करतात. यावेळी बाजारासह ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मवरही बरीच गर्दी असते. अनेक जण स्मार्टफोन हातात असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, शोभेच्या वस्तू आणि घरगुती सामानही ऑनलाइन खरेदी करतात. याच संधीचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतात. ‘दिवाळी धमाका’ अशा आकर्षक नावाने ‘लिंक’ तयार करतात. ती ‘लिंक’ अनेकांच्या मोबाइलवर पाठवतात. यासोबतच इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर ‘दिवाळी ऑफर’च्या जाहिराती करून खालील लिंकवर क्लिक करून गिफ्ट मिळवा, असे सांगितले जाते. ती लिंक उघडताच भेटवस्तू मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगितला जात आहे. त्यामध्ये आपले नाव, मोबाइल क्रमांक, पॅन कार्ड आणि बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितली जाते. भेटवस्तू मिळवण्याच्या नादात अर्जात माहिती भरल्यास सायबर गुन्हेगार ग्राहकाला जाळय़ात ओढतो. दिवाळीची खास ऑफर असल्याचे सांगून मोबाइलवर ओटीपी पाठवून आपल्या खात्यातून परस्पर पैसे लंपास करतो. सायबर गुन्हेगारांना ‘ओटीपी, पासवर्ड’ सांगितल्यामुळे नागपुरातून दोन कोटी रुपये गुन्हेगारांच्या खात्यात गेल्याची माहिती आहे.
मोठय़ा सवलतीच्या नावावर फसवणूक
सण-उत्सव आले की ऑनलाइन किंवा आपापल्या गावी जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. सायबर गुन्हेगार सणासुदीचा फायदा घेत तुमची ऑनलाइन फसवणूक करू शकतात. यात प्रामुख्याने ऑनलाइन हॉटेल बुकिंग, ऑनलाइन फ्लाइट बुकिंग, ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन मोठय़ा सवलतीच्या नावावर फसवणूक होते. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
काय काळजी घ्याल?
लिंक’ किंवा ई-मेलमधील संकेतस्थळाची खात्री करा. ‘लिंक’मध्ये बँकेची, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड यांची माहिती भरू नये. वस्तू घरपोच मागवताना ‘लिंक’ न उघडता संबंधित संकेतस्थळ किंवा अॅपवरून माहितीची तपासणी करावी. वेबसाइट सुरक्षित नसल्यास खरेदी करू नका. वस्तूवर असणारी सूट जास्त असेल तर सावध होऊन जा. फसवणूक करणारे क्लृप्तय़ा वापरत असतात. शक्यतो ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ हाच पर्याय वापरून ऑनलाइन खरेदी करावी.
सायबर गुन्हेगारांच्या सापळय़ापासून वाचायचे असेल तर ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी ‘लिंक’वर क्लिक करू नका. ‘ऑफर’च्या नादात आपल्या बँक खात्याची किंवा क्रेडिट कार्डची माहिती कुणालाही देऊ नका. जर ऑनलाइन खरेदी करताना फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
– नितीन फटांगरे, पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम