नागपूर : देशभरात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रीय झाल्या असून सर्वाधिक सायबर गुन्हेगार छत्तीसगढ, राजस्थान आणि बिहार राज्यात कार्यरत आहेत. देशातील ‘टॉप-२०’ सायबर गुन्हेगारांच्या शहरांमध्ये मुंबईचा शेवटचा क्रमांक आहे, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरुन समोर आली आहे. देशभरात सर्वाधिक आर्थिक फसवणूक सायबर गुन्हेगारांनी केली आहे. अन्य फसवणुकींच्या तुलनेत भारतातील नागरिकांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घालण्याचे प्रमाण मोठे आहे. देशात एका महिन्यात जवळपास १० हजारांवर सायबर गुन्हे घडत आहेत. देशातील कोणत्याही राज्यातील व्यक्तीची ‘डिजीटल’ आर्थिक फसवणूक झाल्यास त्यामध्ये छत्तीसगढ, राजस्थान आणि बिहार या राज्यातील सायबर गुन्हेगारांचा सहभाग नक्कीच असल्याचे पोलीस तपासात समोर येते. त्यामुळे देशभरात सर्वाधिक सायबर गुन्हेगारी छत्तीसगढमधील जामतारा, देवघर, दुमका या शहरातील सायबर गुन्हेगारांनी केल्याची सर्वाधिक शक्यता असते.

तसेच राजस्थानमधील अलवर, जयपूर, डीग आणि खेरताल या शहरात सर्वाधिक सायबर गुन्हेगार सक्रीय आहेत. तसेच बिहार राज्यातील नालंदा, पाटणा, नवादा, शेखपुरा या शहरात नव्याने सायबर टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. देशभरातील ७० टक्के सायबर गुन्हेगारी छत्तीसगढ, राजस्थान आणि बिहार या तीन राज्यातील ११ शहरातून होत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. उर्वरित ३० टक्के सायबर गुन्हेगारी पश्चिम बंगाल (परगना), कर्नाटक (बंगळुरु), उत्तरप्रदेश (मथुरा), हरियाणा (नूह), महाराष्ट्र (मुंबई) आणि दिल्ली या शहरातून होत असल्याची माहिती समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांच्या मोठ्या टोळ्या झारखंड आणि राजस्थान शहरात असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करीत आहेत.

हेही वाचा…योगेंद्र यादव यांच्या सभेत वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; धक्काबुक्की, घोषणाबाजी अन् खुर्च्यांची तोडफोड

जामतारा ‘नंबर वन’

सर्वाधिक आर्थिक फसवणूक जामतारा शहरातून होत आहे. बँक खात्यातून परस्पर पैसे वळते करण्यासाठी आणि ‘लिंक’वर क्लिक केलेल्यांची फसवणूक करण्यात जामतारा शहरातील सायबर गुन्हेगारांचा हातखंडा आहे. क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, पासवर्ड, बँक व्यवस्थापकाच्या नावाचा वापर करुन किंवा खाते गोठविल्याचे सांगून बँकेतील पैसे उडविण्यात जामतारा अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे तर राजस्थानमधील अलवर शहरातून सर्वाधिक ‘सेक्स्टॉर्शन’ करुन सायबर गुन्हेगार पैसे उकळतात. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात कुणीही अडकू नये म्हणून पोलीस नेहमी जनजागृती करतात. तसेच सायबर पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारींचा गांभीर्याने तपास करण्यात येते. अनेक गुन्हे उघडकीस आले असून सायबर गुन्हेगारांच्या घशातून पैसेही तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. – डॉ. रवींद्रकुमार सिंगल (पोलीस आयुक्त)