नागपूर: सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. आता सायबर गुन्हेगारांनी ‘रेकॉर्डेड कॉल’वरून एका व्यावसायिकाची फसवणूक केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल राजेश शर्मा (३३, नंदनवन कॉलनी) हे व्यवसाय करतात. काही दिवसांअगोदर ते कामानिमित्त गुजरातमधील अहमदाबाद येथे गेले होते. त्यांचे मोबीक्विकवर खाते असून स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या त्यांच्या खात्याशी ते जोडलेले आहे.
हेही वाचा… अमरावती: फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेला एका महिन्यात १६.८८ कोटींचे उत्पन्न
२१ ऑगस्ट रोजी अहमदाबादहून रेल्वेने परत येत असताना रात्री साडेदहा वाजता त्यांच्या मोबाइलवर रेकॉर्डेड कॉल आला. ‘तुमच्या मोबीक्विक खात्याशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक बदलण्याचा प्रयत्न झाला आहे व जर तुम्ही हा प्रयत्न केला नसेल तर १ आकडा दाबावा’ असा त्यात संदेश होता. शर्मा यांनी असा कुठलाही प्रयत्न केला नसल्याने त्यांनी एक आकडा दाबला. त्यांना काही वेळातच एक ओटीपी आला. कॉलमधील सूचनेनुसार शर्मा यांनी ओटीपी दाखल केला.
हेही वाचा… वाघाने जिल्हा सोडला पण डरकाळ्या सुरूच; शाळा ओस तर वन कर्मचारी त्रस्त
काही वेळातच त्यांच्या खात्यातून ३० हजार रुपये वळते झाले. ते पैसे मिंत्रा.कॉमला वळते झाल्याचे नमूद होते. शर्मा यांनी या प्रकाराबाबत मोबीक्विक व मिंत्रा.कॉमवर फोन तसेच ईमेलद्वारे कळविले. समोरील आरोपीने त्या पैशांच्या बदल्यात काही वस्तू विकत घेतल्याची शक्यता दिसून येत आहे. शर्मा यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.