लोकसत्ता टीम

नागपूर : नागपूर रँदोन्युअर्सने आयोजित केलेल्या ३०० किलोमीटरच्या ‘नाईट ब्रेव्हेट’ आणि होळी विशेष १०० किलोमीटरच्या ‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’मध्ये सर्व सायकलपटूंनी दिलेल्या वेळेत उद्दीष्ट साध्य केले. यातील दहा सायकलपटूंनी ३०० किलोमीटरची ‘नाईट ब्रेव्हेट’ आणि २३ सायकलपटूंनी १०० किलोमीटरची ‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’ पूर्ण केले.

‘नाईट ब्रेव्हेट’ मुलताईच्या पलीकडे बैतूल मार्गाने तर ‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’ सावनेरच्या पलीकडे दहा किलोमीटर अंतरावर उमरीपर्यंत आयोजित करण्यात आले. यासाठी नोंदणी केलेल्या आणि ३०० किलोमीटर ‘नाईट ब्रेव्हेट’ सुरू करणाऱ्या सर्व सायकलपटूंनी दिलेल्या २० तासात ते पूर्ण केले. शनिवारी दूपारी चार वाजता प्रतापनगरातील एनसायक्लोपिडीया येथून सुरू झालेला ‘ब्रेव्हेट’चा प्रवास रविवारी दूपारी संपला. ही ब्रेव्हेट पूर्ण करणाऱ्यांमध्ये विकास पात्रा, परवेझ अली, किरण भोंडे, विनोद भंडारी, राकेश नायडू, सुधीर चौधरी, मुकुंद कामथ, पीयूष डेकाटे, अमोल बोरकर, सोमसुव्र चॅटर्जी यांचा समावेश आहे. सोमसुव्र आणि मुकुंद यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

सोमसुव्राने भाड्याने घेतलेल्या सायकलवरून ३०० किलोमीटर अंतर पार केले. सूर्य मावळण्याच्या शेवटच्या काही तासांत त्याला खूप संघर्ष करावा लागला, पण तो वेळेतच यशस्वी झाला. सोमसुव्राने १९ तास ५१ मिनिटात ‘ब्रेव्हेट’ पूर्ण केली. शेवटच्या वेळेपेक्षा ९ मिनिटे आधी त्याने हे अंतर पार केले. ‘नाईट ब्रेव्हेट’ हा मुकुंदच्या दृढनिश्चयाचा आणि चिकाटीचा पुरावा होता. गेल्या दोन वर्षांपासून तो ‘सुपर रँदोन्युअर्स’ हा किताब मिळवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला यश आले नाही. वारंवार अपयश येऊनही तो पुढे जात राहिला आणि अखेर या रविवारी त्याने ‘सुपर रँदोन्युअर्स’ हा किताब मिळवला. या वर्षात त्याने २००, ४०० आणि ६०० किलोमीटर ‘ब्रेव्हेट’ पूर्ण केले आहेत. १०० किलोमीटर ‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’ साठी नोंदणी केलेल्या २६ सायकलपटूंपैकी २३ जण यात सहभागी झाले. महिला सायकलपटू राजेश्री डांगे आणि प्राची कुकडे यांच्यासह सर्वांनी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वेळेच्या आत ‘ब्रेव्हेट’ पूर्ण केली.

‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’ पूर्ण करणाऱ्या सायकलपटूंमध्ये विनोदचा विशेष उल्लेख करावा लागेल. या बाभूळगाव सायकलपटूने शनिवारी नवीन सायकल खरेदी केली आणि दुसऱ्याच दिवशी यात तो सहभागी झाला. त्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच ‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’ होती. त्याने बालपणीचा मित्र आणि सहकारी सायकलस्वार प्रतापसिंग यांच्यासोबत हे यश मिळवले. एन्सायक्लोपिडियाचे स्वयंसेवक समाधान उन्हाले यांनी रविवार दुपारपर्यंतच्या संपूर्ण ३०० किलोमीटर आणि शनिवारी रात्रीच्या प्रवासात सायकलपटूंना सहकार्य केले. गुरुवारी १३ एप्रिलला ‘नाईट ब्रेव्हेट’चा २०० किलोमीटरचा टप्पा आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ७७५६०३५१३०, ७७९८७८५०८८ वर संपर्क साधण्याचे आवाहन एनसायक्लोपिडयाने केले आहे.

Story img Loader