डॉक्टर, अभियंते, व्यावसायिकांचा समावेश; लांबपल्ल्याच्या भ्रमंतीला विशेष पसंती
महेश बोकडे, नागपूर</strong>
उपराजधानीतील नागरिक आरोग्याप्रती जागरूक होत आहेत. डॉक्टर, अभियंते, व्यावसायिकांसह सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा लांब अंतर सायकल चालवण्याकडे कल वाढत असून गेल्या पाच वर्षांमध्ये ही संख्या पाचपटींनी वाढली आहे.
नागपूर किंवा देशाच्या कोणत्याही शहरी आणि ग्रामीण भागात पूर्वी सायकलचा एक वेगळाच थाट असायचा, परंतु मोटारसायकल- कार आल्या, सायकल मागे पडू लागली. मात्र हल्ली जीवनशैलीतील बदलांमुळे विविध आजार वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा नागरिक आरोग्याप्रती जागरूक होत असून सायकलकडे परत फिरले आहेत. नागपुरात सायकल चालवणाऱ्यांचे विविध ग्रुप असून ते नियमितपणे शहराच्या चारही दिशेला पहाटे किंवा सकाळी लहान वा लांबवरच्या मार्गावर फिरायला जातात. या ग्रुपमध्ये नागपूर राँदेनियर्स हाही एक महत्त्वपूर्ण ग्रुप आहे.
पॅरिसमध्ये ऑडेक्स म्हणून एक सायकलचा ग्रुप असून त्याच्या अखत्यारित भारतातील ऑडेक्स इंडिया राँदेनियर्स हा ग्रुप येतो. या ग्रुपचे देशाच्या वेगवेगळ्या भागात एकूण ५० लहान शाखा आहेत. उपराजधानीतील नागपूर राँदेनियर्स या ग्रुपने २०१४ मध्ये ३० सायकलप्रेमींसह शहरात लांब पल्ल्याची सायकल चालवण्याचा उपक्रम सुरू केला. हळूहळू या उपक्रमात डॉक्टर, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते, व्यावसायिक, अॅथलॅटिक्स व इतरांनी रस घेणे सुरू केले. त्यामुळे आज शहरातील सुमारे १५० जण लांब पल्ल्याच्या सायकलफेरीत नियमित सहभागी होत असतात. हा प्रवास शहराच्या चारही दिशेने २०० किलोमीटर ते १,२०० किलोमीटपर्यंतचा असतो. या सर्व सायकलीस्टकडून इतरांनाही आरोग्यासह पर्यावरण वाचवण्यासाठी व सायकल चालवण्यासाठी प्रेरित केले जाते. लांब पल्ल्याचा विशिष्ट किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी विशिष्ट वेळही निश्चित केली जाते.
प्रवासाबाबतचे नियम
लांब पल्ल्याच्या निश्चित सायकलिंगसाठी विशिष्ट अंतरावर चेकपोस्ट तयार केली जाते. स्पर्धा सुरू झाल्यावर न्याहारी-पाण्याची सोय केली जाते. प्रत्येक चेकपोस्टवर पोहोचण्यासाठीचा विशिष्ट कालावधी निश्चित असतो. या दरम्यान न पोहोचणारा स्पर्धक स्पर्धेतून बाद होतो. वाटेत स्पर्धकाच्या वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यास केवळ चेकपोस्टवर इतरांकडून दुरुस्तीची परवानगी असते. अन्यथा स्पर्धकाला स्वत:च ही दुरुस्ती करावी लागते.
सुरक्षेसाठी केले जाणारे उपाय
लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये सहभाग घेणारा प्रत्येक स्पर्धक वैद्यकीयदृष्टय़ा फिट आहे की नाही, हे बघितलेत जाते. सायकलिंग सुरू करण्यापूर्वी सायकलच्या समोर आणि मागील लाईट तपासले जातात. प्रत्येकाला हेल्मेट घालणे सक्तीचे असून त्याने रिफ्लेक्टीव्ह जॅकेट घालणेही आवश्यक आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या सुमारे एक तासापूर्वी निश्चित मार्गावर मोटारसायकलवरून पाहणी केली जाते.
अंतर पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी
किलोमीटर निश्चित तास
२०० १३.३०
३०० २०.००
४०० २७.००
६०० ४०.००
१,००० ७५.००
१,२०० ९०.००
उपराजधानीतून निश्चित केले जाणारे मार्ग
* नागपूर- चंद्रपूर- तेलंगणा राज्याची सीमा
* नागपूर- भंडारा- रायपूर
* नागपूर- हैदराबाद
* नागपूर- अमरावती मार्गे- शीम
* नागपूर- कोराडी मार्गे- छिंदवाडा रोड
(टीप- बहुतांश स्पर्धा झिरो माईलवरून सुरू होतात, परंतु काही प्रसंगी स्थळही बदलले जातात.)
‘‘आरोग्यासह छंद म्हणूनही सायकिलगमध्ये नागपूरकरांची आवड वाढत आहे. विशेषत: लांब पल्ल्याच्या सायकलिंगकडे तरुणांसह इतरही वयोगटातील नागरिकांचा कल वाढला आहे. लांब अंतर गाठण्यासाठी सायकल कमी वजनाची हवी. स्पर्धकाच्या वजन-उंचीनुसार सायकल वापरल्यास कुणाला त्रास होत नाही.’’
– अनिरुद्ध रईच, संचालक, एन्साक्लोपिडिया बाईक स्टोर्स, नागपूर