नागपूर : बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘दाना’ चक्रीवादळ आता ओडिशाच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीनंतर ते ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज आहे. दरम्यान किनारपट्टी भागात याचा परिणाम सुरू झाला असून ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तर चक्रवादळानंतर वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही अधिक असेल.
बंगालच्या उपसागरात उगम पावलेले ‘दाना’ हे चक्रीवादळ ओडिशातील भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ उतरेल. ही प्रक्रिया किमान पाच तास तरी चालेल आणि त्यानंतर ओडिशाच्या उत्तरेकडील भागातून हे चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटर वेगाने पुढे जाईल. दरम्यान, या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. ओडिशातील १४ जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून विमानाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर रेल्वेदेखील रद्द करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना येथून परत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा…शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता; दिवाळीपूर्वी मिळणार वेतन, पण…
u
पुरीच्या जगन्नाथ मंदिर परिसरातून सर्व तात्पुरते तंबू काढण्यात आले आहेत. येथील कोणार्क मंदिर देखील दोन दिवसांपासून बंद आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दल याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मदत शिबिरे देखील उभारण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयेदेखील पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुरी आणि सागरदीप दरम्यान भितरकनिका आणि धामरा जवळील भागांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. ‘दाना’ चक्रीवादळाचा परिणाम सात राज्यांमध्ये दिसून येणार आहे. ओडिशातील १४ किनारी जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येईल. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथेही शाळा बंद ठेवण्यात आल्या असून मदत पथके तैनात करण्यात आली आहे. आंधप्रदेशातही मुसळधार पावसासह ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…‘दाना’ चक्रीवादळाचा रेल्वेला फटका; ऐन सणासुदीत प्रवासी गाड्या रद्द
याशिवाय झारखंड, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू या राज्यातही चक्रीवादळचा परिणाम जाणवणार आहे. हवामान खात्याने या सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार नाही. तरीही महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.