नागपूर : “फेईंगल” चक्रीवादळाचे संपूर्ण राज्यावर दाटलेले मळभ आता दूर झाले आहे आणि पुन्हा एकदा राज्याची वाटचाल थंडीच्या दिशेने सुरू झाली आहे. किमान तापमानाने त्याची किमया दाखवण्यास सुरुवात केली असून हे तापमान झपाट्याने खाली येत आहे. एवढेच नाही तर कमाल तापमानात देखील झपाट्याने घसरण होत आहे. एरवी उन्हाळ्यात तापमानाचा उच्चनक गाठणाऱ्या विदर्भात गोठवणाऱ्या थंडीची सुरुवात झाली आहे. विदर्भातील सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद गोंदिया येथे ९.४ अंश सेल्सिअस इतकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूर व संपूर्ण विदर्भावर जमा झालेले ढग आता परतले आहेत आणि थंडी पुन्हा परतू लागली आहे. गेल्या २४ तासांत शहरातील तापमानात तब्बल २.८ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. किमान तापमान १२ अंश सेल्सिअसवरून १० अंश सेल्सिअसवर आले आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे मध्य भारतात ढगाळ वातावरण तयार होऊन किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. आता मात्र शहर व विदर्भातील वातावरण परत एकदा कोरडे झाले आहे. हवामानात प्रचंड बदल झाला आहे. पश्चिमी विक्षोपामुळे उत्तरेकडे होत असलेल्या हिमवृष्टीचा व थंडीचा परिणाम मध्य भारतावरही होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानात प्रचंड वेगाने घसरण होत आहे. गेल्या २४ तासात शहरातील किमान तापमान २.८ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. तर दिवसाच्या तापमानात देखील घसरण झाली आहे.
हेही वाचा…प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
रात्रीच नाही तर दिवसादेखील गार वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसासुद्धा किंचित गारवा जाणवत आहे. यंदाच्या मोसमातील नागपूरचा नीचांक १० अंश सेल्सिअस इतका आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात अधिक घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारा १० अंशापेक्षाही खाली घसरू शकतो. त्यामुळे नागपूरचा या मोसमातील नवा नीचांक नोंदविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अलीकडच्या काही वर्षांपूर्वी ३.८ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद नागपूर शहरात झाली होती. दरम्यान, विदर्भात सर्वाधिक कमी तापमान गोंदिया शहरात ९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. तर नागपूर व वर्धा येथे १० अंश सेल्सिअस तर गडचिरोली येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ब्रम्हपुरी ११.१ तर भंडारा ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यातील तापमानदेखील १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटायला लागल्या आहेत.