अकोला : बहुरंगी व्यक्तिमत्व दादा कोंडके यांच्या पांडू हवलदार या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. हे निमित्त साधून राज्यातील सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. ‘दादा आणि पांडू हवालदार’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत आहे. दादांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी घेतला जात विदर्भातील कार्यक्रम वाशीम येथे होत असल्याचे समन्वयक सचिन गिरी यांनी सांगितले.
कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके हे प्रसिद्ध मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. मराठी चित्रपटांतल्या विनोदी ढंगातील संवाद फेकीमुळे त्यांच्या भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे, याची चांगलीच जाण त्यांना होती. अनेक दशकांनंतरही दादा कोंडके यांचा अभिनय व त्यांच्या चित्रपटाची भुरळ रसिकांवर कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे (भा. प्र. से.) यांच्या नियोजनातून दादा कोंडके यांच्यावर आधारित ‘दादा आणि पांडू हवालदार’ या नाटिकेच्या माध्यमातून उपस्थित रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येणार आहे. दादांच्या जुन्या नव्या चित्रपटातील गीत आणि संवादांच्या माध्यमातून हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. पांडू हवलदार या चित्रपटात ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता प्रमोद शेलार आणि कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. रसिक प्रेक्षकांना प्रत्यक्षात सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांकरिता विनामूल्य राहील, असे सचिन गिरी म्हणाले.

२४ मार्चला ‘दादा आणि पांडू हवालदार’

‘दादा आणि पांडू हवालदार’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागामार्फत वाशीम येथे दि. २४ मार्च सायंकाळी ६.३० स्वागत लॉन येथे घेतला जाणार आहे. त्यामध्ये नृत्य, संगीत आणि संवादाचा समावेश असणार आहे. रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन या ‘कलामृताचा आस्वाद घ्यावा’ असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dada kondke s pandu havaldar movie completed 50 years ppd 88 css