लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : आर्वीतील भाजपच्या राजकारणाचा सावळा गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही. दादाराव केचे हे यातील घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांनी बंडखोरीचा अर्ज दाखल केला, तो नंतर परत घेतला, पुढे फडणवीस यांच्या सभेत हजेरी, विरोधात काम केल्याचा ठपका, त्याने नाराज होत मग राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला व आज पुन्हा भूमिका बदलली.

कार्यकर्त्यांनी सभा बोलावली म्हणून येथे हजर झालो, असे स्पष्ट करीत दादाराव केचे या सभेत म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेत आहे. मतदान झाल्यावर मी पक्षाचे उमेदवार सुमित वानखेडे यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला. काही दारू, मटणपार्टी झोडणाऱ्या लोकांचे हे कारस्थान होते. तसा खोटा प्रचार करण्यात आला. बदनामी केली. त्याने मी उद्विग्न झालो. त्याच निराशेत मी पत्रकार परिषदेत संन्यास घेत असल्याची घोषणा केली. पण पुढील दिवसात मला असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, पक्षनिष्ठ यांचे फोन आले. तुम्ही संन्यास घेणार तर आमचे कसे होणार, असा सवाल हे कार्यकर्ते विचारू लागले. मी विचारात पडलो. त्याच लोकांनी आज मला न विचारता ही सभा घेतली. पण या ठिकाणी सांगतो की, पक्षाच्या नेत्यांचे, सुमित वानखेडे यांचे मन कलुषित करणारे काही आहेत. दारू, मटण यापलीकडे त्यांना काही दिसत नाही. अशा लोकांना सुमित वानखेडे यांनी दूर करावे. त्यांनीच घात केला आहे. अमित शहा, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांनी मला जो शब्द दिला आहे तो ते पाळतीलच. या भागात मी पक्ष उभा केला आहे. सहा महिन्यांत पक्ष उभा होत नाही. त्याच पक्षासाठी मी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेत आहे, अशी घोषणा केचे यांनी केली.

आणखी वाचा-ताडोबातील ‘झीनत’ सिमिलीपालच्या जंगलात पोहोचली…

या सभेत त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून केचे यांनी राजीनामा परत घ्यावा म्हणून आग्रह धरला. केचे यांनी आपल्या भाषणातून फडणवीस व बावनकुळे यांनी मलाच तिकीट देणार अशी हमी दिली होती, असे आवर्जुन नमूद केले. पण इथल्या काही लोकांनी त्यांना भेटून माझी बदनामी केली. माझ्याविषयी मन कलुषित केल्याचे केचे म्हणाले. पण नेत्यांच्या आग्रहास्ताव मी अर्ज परत घेतला. वानखेडे यांच्या प्रचारात झोकून दिले. पण काही लोकांनी मी विरोधात काम केल्याचा अपप्रचार केला. केचेंच्या समर्थनार्थ माजी जि. प. सदस्य नीता गजाम, कारंजा येथील गौरीशंकर अग्रवाल, राजू राठी, विनय डोळे व अन्य ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadarao keche decided to retire from politics and changed his stance again pmd 64 mrj