लोकसत्ता टीम
वर्धा: मतदारसंघात शासकीय निधी देण्याची बाब आमदार दादाराव केचे यांनी प्रतिष्ठेची केली. त्या बाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माझ्या पत्राशिवाय दिलेला निधी परत घेण्याची मागणी इशारा देत केली. केचे यांचा संताप पक्षात चांगलाच गाजतोय. फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांच्यामुळे मिळालेला निधी चर्चेत आला. आता तर निधीमुळे फायदा मिळणारे गावकरी ,कोण कसा हा पैसा थांबवितो, हे पाप करणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आष्टी तालुक्यात अनेक गावात पुर येत असतो. बाकली,जाम,कड व वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण साठी पस्तीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले आहेत. अनेक वर्षांपासून मागणी होत असणारे हे काम मार्गी लागले याचा खूप आनंद या पूरग्रस्त भागात राहणाऱ्या गावकऱ्यांना असल्याचे या भागात काम करणारे भाजपचे जिल्हा सचिव सचिन होले हे म्हणाले.आता पैसा परत करण्याची मागणी करण्याचे पाप कोणी करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यातून सुमित वानखेडे हे एक पाऊल पुढे असल्याचे चित्र उमटत आहे.