नागपूर: Maharashtra Weather Forecast and Dahi Handi celebration पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही भागात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा दहीहंडीचा सोहळा यंदा पावसात न्हाऊन निघणार आहे.
आज आणि उद्या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे व आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. याव्यतिरिक्त मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात अजूनही फारसा मोठा पाऊस पाहायला मिळालेला नाही. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला आहे, तरीही अजूनही राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झालेली नाही. शिवाय ज्या भागात पाऊस पडत आहे तिथेही मुसळधार पाऊस होत नाहीये.