नागपूर : दहीहंडीमध्ये सहभागी गोविंदांना आरक्षण देणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र या गोविंदांची माहिती कशी ठेवणार, त्यांचे शिक्षण काय याबद्दलच्या नोंदी कुठून आणणार, असे अनेक प्रश्न आहेत. केवळ आले मना आणि केली घोषणा हे योग्य नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
सोमवारी या संदर्भात अधिवेशनात बोलणार आहे. गोविंदांना ५ टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली, तेव्हा मी प्रश्न उपस्थित केले नाहीत. मात्र ही घोषणाच अयोग्य आहे. मुख्यमंत्री ज्या ठाण्याचे प्रतिनिधित्व करतात, तिथे गोविंदांची संख्या जास्त आहे. त्या गोविंदांना मला नाउमेद करायचे नाही. पण या गोविंदांना आरक्षण देऊन नोकरी देणार आणि जी मुले-मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करताहेत, त्यांचे काय? मुख्यमंत्री झाल्यानंतर असे भावनिक निर्णय घ्यायचे नसतात. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा अनुभव आहे. एक मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र ५ टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही. ही घोषणा करताना मुख्यमंत्री क्रीडा विभाग किंवा कोणाशीही बोलले नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.
मुंबई स्फोटाची धमकी गंभीरतेने घ्या मुंबईला आलेली धमकी
सरकारने गंभीरपणे घेतली पाहिजे. अनिल अंबानींच्या कुटुंबालाही धमकी आली होती. अनेक वेळेला काही माथेफिरू असे उद्योग करतात. तरीही अशा धमक्या गांभीर्याने घेतल्याच पाहिजे, असेही पवार म्हणाले.
मेळघाटातील बालमृत्यूचे प्रमाण धक्कादायक
अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट, धारणी भागात कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. गेल्या महिन्याभरात १०० अशा घटना घडल्याची माहिती आहे. तिथे जाऊन आढावा घेऊ आणि सोमवारी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचे पवार त्यांनी सांगितले.