अकोला : विदर्भ व मराठवाड्यामध्ये दुग्ध विकास प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. पूर्वी ११ जिल्ह्यातील हा प्रकल्प आता आगामी तीन वर्षात १९ जिल्ह्यांमध्ये राबविला जाईल. वाशीमसह इतर जिल्ह्यांचा त्यात समावेश करण्यात आला. प्रकल्पांतर्गत विविध नऊ घटकांवर ३४८.४२ कोटी रुपये खर्च केले जाणार असून त्यात लाभर्थीचा १७९.१६ कोटी, तर राज्य शासनाचा १४९.२६ कोटींचा हिस्सा राहील. याचा शासन निर्णय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने १६ सप्टेंबरला निर्गमित केला.
राज्यात शेती व शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्याची गरज आहे. शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसायाचा विशेष महत्त्व असते. दुग्धोत्पादनात देशपातळीवर महाराष्ट्राचा सहावा क्रमांक लागतो. राज्यात दुधाच्या उत्पादनात वाढ करणे गरजेचे आहे. राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय प्रगत असतांना विदर्भ व मराठवाडा माघारला आहे. या शिवाय विदर्भ व मराठवाड्यात कमी पर्जन्यमानामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या भागात शेतकरी आत्महत्येतेचे प्रमाण जास्त आहे. शेतकऱ्यांना जोड उत्पनाचे साधन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता प्रामुख्याने दिसून येते.
हे ही वाचा…बुलढाणा : अखेर आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल, काँग्रेस आक्रमक
विदर्भ व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सन २०१६ ते २०२२ या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्पाचा टप्पा एक राबविण्यात आला होता. आता विदर्भ व मराठवाड्यातील सर्व १९ जिल्ह्यांमध्ये दुग्धोत्पादनाच्या वाढीस चालना देण्यासाठी दुग्ध विकास प्रकल्पाचा टप्पा दोन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प राबविला जाईल. या प्रकल्पामध्ये विविध नऊ घटक व भौतिक उद्दिष्ट राहतील. प्रकल्पांतर्गत गायी म्हशींमध्ये पारंपरिक पद्धती, लिंग वर्गीकृत केलेल्या गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा, भृण प्रत्यारोपणांद्वारे दुधाळ जनावरांची संख्या वाढविणे, वैरण विकास कार्यक्रम, पशुंच्या आहार पद्धतीत सुधारणा, गावपातळीवर पशुआरोग्य सेवा, उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या गायी-म्हशींचे वाटप, रोजगार निर्मिती आदी उद्दिष्ट्ये राहणार आहेत.
हे ही वाचा…लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती.. महिला व बालविकास मंत्री म्हणाल्या…
१३ हजार ४०० दुधाळ जनावरांचे वाटप होणार
उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी-म्हशींचे वाटप प्रकल्पात केले जाणार आहे. विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यात तीन वर्षाच्या कालावधीत १३ हजार ४०० दुधाळ गायी- म्हशी दिल्या जातील. एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत दिवसाला किमान ८ ते १० लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हशीचे वाटप होईल