अनिल कांबळे
नागपूर : ‘दलित असताना येथे का आला’ अशी विचारणा करीत मंदिरातून शोभायात्रा पाहून परत जात असताना वाटेत सात ते आठ जणांच्या समूहाने केलेल्या बेदम मारहाणीत एका दलित युवकाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी आहे. रविवारी सायंकाळी ही घटना रामटेकमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.
विवेक विश्वनाथ खोब्रागडे (२१, सीतापूर, देवलापार. ता. रामटेक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे तर फैजान खान (पवनी) असे जखमी युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक खोब्रागडे व त्याचा मित्र फैजान खान हे दोघे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दुचाकीने रामटेकच्या प्रसिद्ध गडमंदिरात शोभायात्रा पहायला गेले होते. ती संपल्यानंतर परत येत असताना गडमंदिर मार्गावर या दोघांना मनीष भारती, जितेंद्र गिरी, सत्येंद्र गिरी व त्यांच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी अडवले. ‘तुम्ही दलित आणि मुस्लीम असूनही येथे कशाला आले?’ असा सवाल केला. ‘तुम्ही गाडीला धडक दिली. त्याच्या नुकसान भरपाईपोटी पैसे द्या’ अशी मागणी करत बेदम मारहाण केली. दोघेही अर्धमेल्या अवस्थेत गेल्यावर मनीषने फैजानला कुटुंबीयांना फोन करण्यास सांगितले. फैजानने भावाला फोन करून घटनास्थळावर बोलावून घेतले. मनीषने फैजलच्या भावाकडून ऑनलाईन १० हजार रुपये घेतले. त्यानंतर जखमी अवस्थेतच विवेक व फैजान व त्याचा भाऊ हे तिघेही घरी परत गेले. दरम्यान, विवेकचे वडील विश्वनाथ घरी आल्यावर त्यांना ही घटना समजली. त्यांनी विवेकला कामठीतील चौधरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथ डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी रामटेक पोलिसांनी विश्वनाथ खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून खून आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणातील आरोपी मनीष बंडूजी भारती (३७), जितेंद्र गजेंद्र गिरी (२३) आणि सत्येंद्र गजेंद्र गिरी (२५) सर्व रा. अंबाडा वार्ड, रामटेक यांना अटक केली. अन्य आरोपी सध्या फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आशीत कांबळे हे करीत आहेत.
माझ्या मुलाची जातीय द्वेषातून हत्या करण्यात आली आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विवेकचे वडील विश्वनाथ खोब्रागडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
“घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.”- आशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी (रामटेक विभाग)