वर्धा: सलग ४० दिवस जिल्ह्यात  संततधार  पडली. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते. तसेच शेतात पाणी साचल्याने हजारो हेक्टरवरील पिके वाया गेली आहे. थांब रे बाबा आता, अशी विनवणी शेतकरी करीत असल्याचे पाहायला मिळते. मात्र रविवारी रात्री काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून आज सकाळपासून ढगाळ वातावरण दाटून आले आहे. या दोन दिवसात वृष्टी झाल्यास काही भागात पूर येण्याची शक्यता व्यक्त होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जलाशये  १०० टक्के

जिल्ह्यातील बहुतांश धरणात क्षमते एव्हढा पाणी साठा झाल्याची आकडेवारी आहे. पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन, उन्नई, सुकळी , कार प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर लाल नाला, धाम, नांद, वडगाव, अप्पर वर्धा ही धरणं ९५ टक्के पाणीसाठ्यावर गेली आहेत.मंजूर मर्यादेपेक्षा पाणी साठा अधिक झाल्याने धरण सुरक्षा म्हणून आज सकाळी सहापासून बोर प्रकल्पचे सर्व पाच दरवाजे बंद करण्यात आले आहे. नदीपात्रात विसर्ग बंद करण्यात आल्याने नदी काठच्या गावांना सावध करण्यात आले आहे. डोंगरगाव धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. निम्न वर्धा धरण क्षेत्रात रात्री पाऊस झाल्याने खबरदारी म्हणून विसर्ग बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>VIDEO : अवघ्या काही महिन्याच्या वाघिणीने केली शिकार, पण..

सर्व लघु प्रकल्प ओव्हरफ्लो

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लघु प्रकल्प असून सर्वच ठिकाणी सांडव्यावरून पाणी वाहू लागत आहे. कवाडी, सावंगी, लहादेवी, अंबाझरी, पांजरा, उमरी, टेम्भू्री, बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुऱ्हा, रोठा एक व दोन, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हराशी टाकली, शिरुड हे लघु प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहे.

१० जुलै पासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. काही अपवाद वगळता जुलै पूर्ण महिना तसेच ऑगस्टमध्ये २० दिवस तर सप्टेंबरच्याही पहिल्या आठवड्यात दमदार वृष्टी झाल्याची नोंद आहे. नदी नाल्यांना  पूर आल्याने काही रस्ते पूर्णतः उखडले आहेत. तसेच गावनाल्यावरील  छोटे पूल खचून पडले. पुरात चार व्यक्ती वाहून गेल्यात त्यांचे शव तब्बल ४८ तासांनी हाती लागले. बचाव पथकच्या तीन चमू वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. हिंगणघाट, सेलू, समुद्रपूर, आर्वी, देवळी या तालुक्यातील असंख्य गावात पुराचे पाणी साचले असल्याने ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dam overflows due to heavy rain in wardha pmd 64 amy