लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून रुग्ण केस पेपर न घेताच इतरत्र उपचारासाठी परस्पर निघून जात असल्याने ‘डामा’चा हा प्रयोग रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. हा प्रकार पुसद येथील एका रुग्णाच्या निमित्ताने चर्चेत आला.

पुसद येथील बाळू राठोड यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना १३ जानेवारी रोजी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. रात्री तब्येत स्थिर झाल्यानंतर त्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार १४ च्या मध्यरात्री तीन वाजता त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले. मात्र, त्यांना उपचाराची कोणतीही कागदपत्रे, म्हणजेच केस पेपर देण्यात आले नाही. आता राठोड यांच्या नातेवाईकांनी उपचाराबद्दल विचारणा केली असता, त्यांना उद्धट उत्तरे देण्यात आली. रुग्णावर नेमके कोणते उपचार करण्यात आले, कोणती औषधे देण्यात आली, याची कोणतीही माहिती नातेवाईकांना देण्यात आलेली नाही. केस पेपरची मागणी केली असता, कर्तव्यावरील शिकाऊ डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असा आरोप राठोड यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. उपचाराची नोंद चक्क रुग्णालयाच्या ’व्हिजीटर्स’ बुकमध्ये केली जात असल्याचा संशय रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. रुग्णालयात केस पेपर दिले जात नाहीत. तेव्हा ‘व्हिजीटर्स’ बुकमध्ये नोंद करून रुग्णांना वार्‍यावर सोडले जात असल्याचा आरोपही होत आहे. हा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राठोड यांच्या मुलाने केला आहे.

जेव्हा एखादा रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध उपचार पूर्ण होण्याआधीच, स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णालयातून निघून जातो, तेव्हा त्या परिस्थितीला ‘डामा‘ (डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडव्हाइस) असे म्हटले जाते. रुग्णाला रुग्णालयातून केव्हाही निघून जाण्याचा अधिकार आहे. रुग्ण स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णालयातून निघून जातो, याचा अर्थ असा की पुढील परिणामांसाठी रुग्णालय जबाबदार राहणार नाही. विशेष म्हणजे, रुग्णालयातून डामाअंतर्गत निघून गेलेल्या रुग्णाला रुग्णालयाकडून सर्व उपचार केलेली कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक रुग्णालये ’डामा’चा गैरवापर करून रुग्णांना केस पेपर देण्यास टाळाटाळ करतात, जे नियमांच्या विरोधात आहे, असा आरोप राठोड कुटुंबीयांनी केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकडून या नियमाची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.

चौकशीचे आदेश

अनेकदा रुग्ण इतर ठिकाणी उपचार घेण्यासाठी परस्पर निघून जातात. प्रकृतीच्या कारणाने डिस्चार्ज पेपर तयार होईपर्यंतही ते थांबण्यास तयार नसतात. मात्र अशा रुग्णांनी त्यांचे केस पेपर मागितल्यास त्यांना देण्यात येते. एक अर्ज करून ही माहिती मिळविता येते. राठोड यांच्या प्रकरणात रुग्ण स्वतःहून घरी गेला. या संदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांचा मुलगा आला होता. मात्र त्यांच्याकडून उपचारांच्या केस पेपरसाठी लेखी अर्ज अद्यापही आलेला नाही. तरीही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांनी दिली.