चंद्रपूर: जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ६ हजार ५१८ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, भात, भाजीपाला शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून १० हजार ४२१ शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे. मागील वर्षी आलेल्या पुरापेक्षा यावर्षी आलेला पूर मोठा असल्याने वर्धा नदीकाठील शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.

मागील आठवड्यात जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरईला पूर आला. मात्र, मागील तीन दिवसांपासून जिल्हाभरात पाऊस नसतानासुद्धा नद्यांना पूर कायम आहे. वैनगंगा व वर्धा या दोन्ही नद्या संगमावर तुंबल्या असल्याने पुर वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई नदीपात्रालगतच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस नसल्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. २०२२ मध्ये वर्धा व वैनगंगा नदीला आलेल्या पुरापेक्षा २०२३ चा पूर मोठा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पुरामुळे जिल्हाभरातील ६ हजार ५१८ हेक्टरवरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे २०० गावे बाधित झाली असून १० हजार ४२१ शेतकऱ्यांचे या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची विधानसभेत दखल; गडचिरोलीतील युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेल्याचे प्रकरण

पुराने पिके वाहून नेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. कापूस, सोयाबीन, भात या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान चंद्रपूर, बल्लारपूर, मुल, चिमूर, वरोरा, नागभीड, गोंडपिपरी तालुक्याचे झाले आहे. नुकसानीची आकडेवारी ही प्राथमिक असल्याने यामध्ये नुकसानीचे क्षेत्र वाढणार आहे. दरम्यान शासनाकडून पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी निर्देशाच्या प्रतिक्षेत आहे.

हेही वाचा – ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची विधानसभेत दखल; गडचिरोलीतील युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेल्याचे प्रकरण

हेही वाचा – अमरावती: चिखलदरानजीक दरड कोसळली; घटांग मार्गावरील वाहतूक बंद, सुदैवाने…

आज व उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक २५ ते २९ जुलै २०२३ या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार २६ ते २७ जुलै या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्‍ह्यात सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम पाऊस विजांच्‍या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. तसेच दि. २८ व २९ जुलै या कालावधीत चंद्रपूर जिल्‍ह्याकरीता यलो अलर्ट असून या कालावधीत एक-दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे.

Story img Loader