अकोला: सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून थकबाकीदार असलेल्या जिल्ह्यातील सात हजार ६८८ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती केली आहे.
अकोला शहरासाठी पाच दामिनी पथक कार्यरत केले असून केवळ दोन दिवसात या पथकाने १२१ ग्राहकांवर कारवाई केली. अकोला परिमंडळात ‘मिशन ९० दिवस’ राबविण्यात येत आहे. यामध्ये परिमंडळातील थकबाकी शुन्य करण्याचे नियोजन केले. त्या अंतर्गत अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या संकल्पनेतून शहरासाठी पाच दामिनी पथक तयार करण्यात आले आहेत. एका दामिनी पथकात अतिरिक्त कार्यकारी, उपकार्यकारी अभियंत्यासह १० महिला अभियंता, कर्मचारी सहभागी आहेत. त्यांच्या सहकार्याला सुरक्षा रक्षक आणि कारवाई सुरू असलेल्या वितरण केंद्रातील तंत्रज्ञाचा समावेश आहे.
हेही वाचा… नागपूर: कार ट्रकला धडकली; भीषण अपघातात मायलेक जागीच ठार
१० हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या वीज ग्राहकावर दामिनी पथकाकांकडून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात अश्या ग्राहकांची संख्या सात हजार ६८८ असून त्यांच्याकडे १७ कोटी ८६ लाख रुपये थकीत आहेत. दामिनी पथकाच्या कारवाईत थकबाकीदार ग्राहकांना एक संधी देत तात्काळ शंभर टक्के वीजबिल न भरल्यास त्यांचे मिटर दामिनी पथकाकडून जप्त करण्यात येणार आहे.
शहरात कालपासून सुरू झालेल्या कारवाईत ९५ ग्राहकांनी तत्काळ पाच लाख ६८ हजाराचा भरणा केला, तर २६ ग्राहकांचा सहा लाख ३८ हजाराच्या थकबाकीसाठी मीटर जप्त केले. शहरात १० हजारापेक्षा जास्त थकबाकी व सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून वीज बिल न भरणाऱ्या तीन हजार १५५ ग्राहकांकडे आठ कोटी २६ लाख थकीत आहेत.