लोकसत्ता टीम
नागपूर : मोसमी पावसाने महाराष्ट्रातून माघार घेतली तरी पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. मात्र, हा मान्सूनचा पाऊस नाही, तर अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पडणारा पाऊस आहे. दरम्यान, आता एका नवीन चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत.
हवामान खात्याचा अंदाज काय?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमानच्या समुद्रात ‘दाना’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली असून ते आज, बुधवारी बंगालच्या उपसागरात पोहचेल असा अंदाज आहे. २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा २५ ऑक्टोबरच्या पहाटे ते पुरी किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज आहे. दरम्यान, या काळात या काळात ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे. या वादळाचा परिणाम म्हणून ओडिशा आणि पश्चिम बंगाल या भागांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे. आज, बुधवारी या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. वादळाची दिशा ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेने झुकणारी असल्याने महाराष्ट्राला या वादळाचा थेट धोका नाही.
आणखी वाचा-‘लाडकी बहीण योजना’ याचिकाकर्त्यांचा खळबळजनक दावा, म्हणाले “माझ्या जीवाला…”
सरकार कोणती काळजी घेत आहे ?
पुरीमध्ये आलेल्या पर्यटकांना परत पाठवण्यात आले आहे. ओडिशामध्ये देखील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आजपासून पुढील दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ओडिशात लोकांना स्थलांतरित केले जात आहे. बंगालमध्येही या वादळाचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये “दाना” या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येईल, असा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात स्थिती काय ?
महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली असली तरी राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यात येत्या २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील. तर परभणी, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण राहिल. तर पुण्यासह सातारा, सांगली येथे पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मान्सूननंतर अजूनही पावसाने पाठ सोडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘दाना’ चा अर्थ काय?
या चक्रीवादळाला “दाना” हे नाव कतारने दिले आहे. अरबी भाषेत ‘दाना’ म्हणजे ‘उदारता’ असा अर्थ होतो. सर्वात उत्तम आकाराचे, मौल्यवान आणि उत्कृष्ट मोतीचे ते प्रतीक आहे. पर्शियनमध्ये, ‘दाना’ चा अर्थ ‘ज्ञानी’ किंवा ‘जाणकार’ असा देखील होतो.