“गर्भवती महिलेतील अनियंत्रित मधुमेहामुळे मुलाला अपंगत्व येऊ शकते. या महिलांवर लक्ष केंद्रित केल्यास देशातील भावी पिढीच्या वाट्याला येणारे मधुमेह नियंत्रित करणे शक्य आहे.”, असे मत डायबेटिज प्रेग्नेन्सी ऑफ इंडियाचे संस्थापक पद्मश्री डॉ. विरास्वामी शैषया यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. प्रसंगी मधूमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता, कविता गुप्ता उपस्थित होते.

“अनेक महिलांना गरोदरपणात मधुमेहाची समस्या दिसते. गर्भधारणेचा काळ जसजसा पुढे जातो, तसे इन्सुलिनच्या स्त्रावात वाढ होते. जेव्हा ही वाढ पुरेशी होत नाही, तेव्हा गरोदरपणातील मधुमेह निर्माण होतो. या वाढलेल्या साखरेचे योग्यतऱ्हेने व्यवस्थापन गरजेचे असते. दरम्यान, या काळात मधूमेह आढळणाऱ्यांतील ८० टक्के महिलांचे मधुमेह प्रसूतीनंतर सामान्य होते. परंतु त्या जोखमेत असतात. या महिलांना गर्भधारणा झाल्यावर पहिले दहा आठवडे विशेष काळजी घेतल्यास बाळाला संभावित धोके टाळले जाऊ शकतात.”, असेही डॉ. शैषया म्हणाले.

या काळात उच्चरक्तदाबाचा धोका वाढतो –

डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, “हल्ली प्रसूती काळातील मधुमेह वाढत असून देशातील मधुमेह आजारावर नियंत्रणासाठी या महिलांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मधुमेहामुळे महिलांमध्ये गर्भपाताचा धोका वाढतो, वेळेपूर्वीच प्रसूती वेदना, मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग यांचा धोका वाढतो. या काळात उच्चरक्तदाबाचा धोका वाढतो. फुप्फुस, मूत्रपिंड आणि हृदयविकार होण्याचाही धोका असतो. हे आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने नित्याने व्यायाम, खानपानावर लक्ष देण्याची गरज आहे. ”

२२० मधुमेह तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार –

डायबेटिज अकादमी, डायबेटिज केअर फाउंडेशन ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे २४ ते २६ जूनपर्यंत रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे ८ व्या डायबेटिज अकादमी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हॅलो डायबेटिजचे डॉ. सुनील गुप्ता, डॉ. शशांक जोशी, डॉ. ए. के. दास, डॉ. सुंदर मुदलियार, डॉ. कविता गुप्ता, डॉ. बंसी साबू यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह व गर्भावस्था या विषयांसह विविध विषयांवर चर्चा होईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे २२० मधुमेह तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत, असे डॉ. सुनील गुप्ता यांनी सांगितले.