चंद्रपूर : निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे पक्षी, प्राण्यांनी आपला मोर्चा गावाकडं, शहराकडे वळविला आहे. मिळेल ते खाऊन आपले पोट भरत आहे. काही पक्षीप्रेमी आहेत. ते पक्ष्यांना अन्नधान्य देतात. अन् पक्षीही मोठ्या आनंदाने ते धान्य टिपतात. अशाच एका व्हिडीओमध्ये दोन पोपट व दुर्मिळ झालेल्या चिमण्या एकत्र येत धान्य टिपत असल्याचे दिसून येत आहे.
चिमण्यासुद्धा आपल्याला धान्य खायला मिळेल काय? या आशेवर पोपटांच्या सभोवताल फिरत आहेत. हा व्हिडीओ खरच इतरांना आनंद देणारा आहे. हा व्हिडीओ टिपलाय दशरथ लाखे यांनी. वरोरा येथील मोकाशी ले आऊट येथील रहिवासी दशरथ लाखे यांनी आपल्या मोबाईलमध्ये या पोपटांचा दाणे टिपण्याचा व्हिडीओ टिपला आहे.
हेही वाचा – वारली चित्रकलेचा अद्भुत शालेय आविष्कार, पंतप्रधानांच्या हस्ते होणार प्रकाशन
लाखे पक्षीप्रेमी आहेत. ते व्हिडीओकॉन कंपनीमध्ये काम करतात. लाखे यांच्या घरी अनेक प्रकारची छोटी-छोटी झाडं आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी पक्ष्यांचे नियमितपणे आवागमण असते. पण त्यांना खायला मिळत नाही, हे लाखे यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपल्याच गेटच्या पिल्लरवर त्यांनी धान्य टाकणं सुरू केलं.
हे धान्य खाण्यासाठी चिमण्या येऊ लागल्या. बाजूच्या पिल्लरवर एका प्लेटमध्ये लाखे यांनी पाणी ठेवलं. धान्य खाऊन झाल्यानंतर त्या चिमण्या आनंदाने पाणी पिऊ लागल्या. हा मोठा आनंद चिमण्यांनी लाखे यांना दिला. काही दिवसांपासून त्यांच्याकडे आता दोन पोपट येत आहेत. ते धान्य टिपतात. पाणी पितात. आणि उडून जातात. त्यानंतरच उरल्यासुरल्या धान्यावर चिमण्या ताव मारतात, असा दशरथजी लाखे यांचा अनुभव आहे. काही पक्षीप्रेमी आहेत. काही झाडांवरील पक्ष्यांना पेरू, आंबे, चिकू इतर फळं खातात म्हणून हाकलून लावतात. पण हेच पक्षी निसर्गाचे संतुलन राखतात, हे त्यांच्या कसे बरं लक्षात येत नाही.
हेही वाचा – प्रयोगशील शेतकरी व कृषी पदवीधर ठरताहेत प्रेरणादायी! कृषी विद्यापीठाचा ‘आयडॉल’ उपक्रम
पण याला काही अपवाद आहेत. अगदी छोट्या प्रसंगातून आनंद घेणाऱ्या पक्षीप्रेमी दशरथ लाखे यांच्या कार्याला मानाचा मुजरा! शिक्षक अरूण उमरे यांनीदेखील या पोपट व चिमण्या आपसात न भांडता धान्याचे दाणे एक एक करून टिपत आहेत. इथे माणूस एकमेकांसोबत भांडत, वाद करत असताना पक्षांमध्ये प्रेम असल्याचे सांगितले.