लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा: राजकारणात ४५ वर्ष घालवतांना लोकसभा ते नगरपालिका अशा सर्व निवडणुकीत सक्रिय सहभागी होणारे व्यक्तिमत्व आणि समाजवादी काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी व आता भाजप असा चौफेर राजकीय प्रवास पूर्ण करीत प्रकृती अस्वस्थमुळे केवळ संवाद साधण्यापुरते सक्षम असलेले दत्ता मेघे यावेळी प्रथमच आयुष्यात राजकारणावर मौन बाळगून आहेत.

विधानसभा निवडणुकीची धामधूम, त्यातच पुत्र समीर व पुत्रवत डॉ. पंकज भोयर निवडणुकीस उभे असतांना ते घराबाहेर पडलेले नाही. आमदार नसतांना शरद पवार यांनी त्यांना मंत्री १९७८ मध्ये थेट मंत्री केले होते. पुढे राष्ट्रवादीची स्थापना व आलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावरही लाभलेले मंत्रिपद. असा योग लाभलेले ते एक राजकारणी. नागपूर, रामटेक व वर्धा अशा तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून लोकसभेवर गेलेले ते एकमेव. पवार विश्वासू म्हणून राज्यसभा पण लाभली. पण पुढे पवारांची साथ सोडून ते काँग्रेसमध्ये आले. राजकारणातील हवेचा अभ्यास ठेवून असणारे दत्ता मेघे २०१४ साली भाजप मध्ये आले. भाजपतर्फे उभे राहण्याचा आग्रह मोडून निष्ठा म्हणून काँग्रेसतर्फे उभे राहून पराजित झालेले ज्येष्ठ पुत्र सागर यांना राजकारणात स्थिर करू नं शकल्याचे त्यांना शल्य. पण भाजपने धाकटे पुत्र समीर यांना आमदार करीत फुंकर घातली. पण या चार तपाच्या राजकारणात ते प्रत्येक निवडणुकीत सक्रिय राहल्याने आज त्यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवति आहे.

आणखी वाचा-वणी येथील जगन्नाथबाबा संस्थानची जमीन विनापरवानगी विक्री; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर माजी आमदारांचा आरोप

निवडणुका लागल्या की दत्ताभाऊ चर्चेसाठी आले नाही असे कधी झाले नाही, अशी आठवण मेघे यांच्या राजकीय आरंभाचे साक्षी व कौटुंबिक मित्र पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री सांगतात.प्रथमच ते निवडणुकीत आले नाही, याचे शल्य वाटते अशी भावना अग्निहोत्री व्यक्त करतात. भाजप नेते नितीन गडकरी हे विद्यार्थी चळवळीत असतांना मेघे सोबत जुळले. पक्ष भिन्न. सर्वांशी सख्य ठेवून वाटचाल करणाऱ्या मेघे यांनी राजकीय वाटचाल वेगळ्या मार्गाने ठेवली तरी पवारस्नेह कायम राखला आहे. होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकीत दत्ता मेघे सक्रिय नव्हते. पण सावंगीत येऊन रामदास तडससाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करते झाले होते. तडस म्हणतात माझ्या राजकीय आयुष्याचे शिल्पकार असलेले मेघे माझ्या निवडणुकीत यावेळी पूर्णवेळ देवू शकले नाही, ही बोच कायम राहील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Datta meghe in vidarbha politics is out of election for first time pmd 64 mrj