अकोला : वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जबाबदारी सोडल्यानंतर हे पद रिक्त होते. सामान्य प्रशासन विभागाने २६ मार्चला शासन निर्णय निर्गमित करून वाशीम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांची निवड जाहीर केली.
राज्याच्या मंत्रिमंडळात वाशीम जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना स्थान नाही. वाशीमला बहुतांश वेळा बाहेर जिल्ह्यातीलच पालकमंत्री लाभले आहेत. शिवसेनेकडील वाशीम जिल्ह्याचे पाल कमंत्री पद राष्ट्रवादीच्या कोट्यात गेले. त्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली होती. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कागल ते वाशीम हे भौगोलिक अंतर सुमारे ६३० कि.मी. आहे. एवढ्या लांबवरचे अंतर पार करून हसन मुश्रीफ वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पार पाडू शकतील का? हा प्रश्न होताच.
कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असलेल्या हसन मुश्रीफ यांची वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर बोळवण करण्यात आल्याने ते नाराज होते. तरीही त्यांनी वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारून २६ जानेवारीला जिल्ह्यात हजेरी लावली. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतांनाच भौगोलिकदृष्ट्या लांब पडत असल्याने कारण पुढे करून वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांनी सोडली. गेल्या काही दिवसांपासून वाशीम पालकमंत्री पद रिक्त होते. अखेर आज शासन निर्णय निर्गमित करून वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती केली आहे. शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय काढण्यात आला.
नव्या पालकमंत्र्यांपुढे वाशीमच्या विकासाचे आव्हान
दुर्लक्षित व उपेक्षित जिल्हा म्हणून वाशीमची ओळख आहे. या जिल्ह्यातील प्रश्न, समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत. विकासात्मक दृष्ट्या मागासलेल्या वाशीम जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर आणण्याचे मोठे आव्हान नव्या पालकमंत्र्यांपुढे राहणार आहे. वाशीमचा नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात समावेश आहे. त्यामुळे केंद्र शासनाचे जिल्ह्याच्या विकासात्मक कामावर लक्ष आहे. जिल्ह्यात सिंचन, रस्ते बांधणी, औद्योगिक विकास, शाळा, आरोग्य सुविधा आदी विकासात्मक कामे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर नव्या पालकमंत्र्यांची भूमिका काय राहते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.