लोकसत्ता टीम
नागपूर : दरवर्षी २१, २२ मार्च तसेच २२, २३ सप्टेंबरला विषुव दिन असतो, म्हणजेच सूर्य अगदी विषुववृत्तावर असतो. मात्र, आपल्याकडे उत्तर गोलार्धात २३ सप्टेंबरला दिवसरात्र समान नसते. पाठ्यपुस्तकातील आणि सर्वसामान्य माहितीप्रमाणे २३ सप्टेंबरला दिवस रात्र समान असतात, पण ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे संस्थापक व खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी वैज्ञानिकदृष्ट्या ते चुकीचे असून ते बदलले पाहीजे, असे सांगितले.
पृथ्वी सूर्याकडे २३.५ अंशाने कललेली असल्याने वर्षभर पृथ्वीच्या २३.५ अक्षांशावर उत्तर-दक्षिणेला दर रोज जागा बदलताना दिसते. याला क्रांती वृत्त म्हणतात. सूर्याच्या कर्कवृत्तावरून मकर वृत्ताकडे जाण्याच्या भासमान मार्गाला दक्षिणायन आणि मकर ते कर्कवृत्ताकडे जाण्याचा मार्गाला उत्तरायण म्हणतात. या दोन्ही मार्गक्रमणावेळी सूर्य २१,२२ मार्च आणि २२,२३ सप्टेंबरला दोनदा विषुववृत्त पार करीत असतो. त्या दिवसांना विषुवदिन किंवा संपात दिन (Equinox) म्हटले जाते. २०२३ ला विषुवदिन २३ सप्टेंबरला दुपारी १२.२० वाजता आहे. आपण याच दिवशी दिवस रात्र समान असते, असे म्हणत असतो, पण खगोलीय आणि भौगोलिकदृष्ट्या ते चुकीचे आहे. या दिवशी जगात सर्वत्र दिवस रात्र समान नसते.(१२ तासाचा दिवस आणि १२ तासाची रात्र) उत्तर गोलार्धात आपल्याकडे २३ सप्टेंबरनंतर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या दिवशी दिवस-रात्र समान असते. पृथ्वी गोल असल्याने आणि प्रकाश वक्रीकरणामुळे हे दिवस वेगळे असतात.
आणखी वाचा-प्रेमविवाहाला आई वडिलांची परवानगी आवश्यक! ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव; ‘राईट टू लव्ह’ची नोटीस
कोणत्या तारखेला दिवस रात्र समान ?
उतर गोलार्धात ६० अक्षांशावर २५ सप्टेंबरला, ४० अक्षांशावर २६ सप्टेंबरला, ३० अक्षांशावर २७ सप्टेंबरला, २० अक्षांशावर २८ सप्टेंबरला, १५ अक्षांशावर ३० सप्टेंबरला, १० अक्षांशावर ४ ऑक्टोबरला दिवस-रात्र समान असते.
महाराष्ट्रात केव्हा-कुठे दिवस-रात्र समान?
महाराष्ट्रात अक्षांशानुसार २८-३० सप्टेंबरला दिवस रात्र समान असेल. २३ सप्टेंबरला महाराष्ट्रात कुठेच दिवस रात्र समान नसते. २३ तारखेला मुंबई येथे १२.०४.३६ तासाचा दिवस, तर ११.५३.३४ तासाची रात्र असते. नागपूर येथे १२.०४.४१ तासाचा दिवस, तर ११.५३.३३ तासाची रात्र असते. चंद्रपूर येथे १२.०४.३९ तासाचा दिवस, तर ११.५५.३३ तासाची रात्र असते. २८ सप्टेंबरला नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, धुळे, जळगाव येथे दिवस रात्र समान, तर २९ सप्टेंबरला मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर, सातारा, सोलापूर येथे दिवस रात्र समान, तर ३० सप्टेंबरला कोल्हापूर, रत्नागिरी येथे दिवस रात्र समान असेल.