नागपूर: समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाची घटिका आता जवळ आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी रविवारी त्याची पाहणी देखील केली. पण त्यांच्याच बरोबर या वन्यप्राण्यांसाठी जे भुयारी मार्ग व उड्डाणपूल तयार करण्यात आले, त्याची पाहणी देखील वन्यप्राण्यांनी केली. रविवारी या महामार्गावर चक्क अजगराने त्याच्या मार्गाची पाहणी केली.
जंगलालागत आणि जंगलातून हा महामार्ग गेला आहे. त्यामुळे महामार्गाची घोषणा केली तेव्हाच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्यातील तज्ज्ञांचा आणि वनखात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती गठीत करण्यात आली.
त्यांनी सुचवल्यानुसार या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल तयार करण्यात आले. त्यात त्रुटी असल्याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच हरणांनी दिला. भरधाव वेगाने वाहने धावणाऱ्या या महामार्गावर भरधाव वेगाने हरणांची जोडी धावताना आढळली. त्याचवेळी वन्यप्राण्यांसाठी असलेल्या उपशमन योजना त्रुटीपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. आता या महामार्गावरून हा भलामोठा अजगर जाताना दिसून आला.