चंद्रपूर : मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रसिद्ध समाजसेवक दिवंगत बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या अथक परिश्रमातून उभे राहिलेले कुष्ठरुग्णांचे आनंदवन व महारोगी सेवा समिती अमृत महोत्सवी वर्षात आर्थिक अडचणीत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आनंदवन व महारोगी सेवा समिती या संस्थेला तीन कोटी आठ लाखांचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. या निर्णयामुळे ७५ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचण दूर होणार आहे.

आनंदवन महारोगी सेवा समिती ही कुष्ठरुग्णांची तसेच अंध, अपंग, मुकबधीरांची सेवा करणारी संस्था बाबा आमटे व साधनाताई आमटे यांनी उभी केली. शासनाकडे चार कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रलंबित असल्याने या संस्थेसमोर असंख्य आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संस्थेचे विश्वस्त तथा बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी आनंदवन आर्थिक अडचणीत असल्याची व्यथा मांडली होती. आनंदवनाची ही व्यथा ‘लोकसत्ता’ने वृत्त स्वरूपात ४ जानेवारीच्या अंकात प्रकाशित केली होती. या वृत्ताची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आणि कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी एक कोटी ८६ लाख रुपये, आनंद अंध, मूकबधिर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी एक कोटी २२ लाख रुपये, असे एकूण तीन कोटी आठ लाख रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली आहे.

हेही वाचा : अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात: महाविद्यालयांची टाळाटाळ अन्…

दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी ७५ वर्षांपूर्वी १९४९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीची स्थापना केली. संस्थेचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. संस्था आर्थिक अडचणीत असल्याची बाब संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली होती. यामुळे महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

Story img Loader