नागपुरातील पूरस्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. नागपुरात कमी वेळत १०९ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. त्यातील ९० टक्के पाऊस हा फक्त दोन तासांत पडला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. यात तीन लोकांचा आणि १० जनावरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.
“नागनदीच्या भिंती पडल्यानं नुकसान झालं आहे. लोकांच्या घरात पाणी गेल्यानं गाळ आणि चिखलाची परिस्थिती झाली आहे. अनेक लोकांना स्थलांतरीत केलं असून, जवळपास १० हजार घरांमध्ये पाणी शिरलं आहे. झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गाळ घरांमध्ये गेल्यानं लोकांना अन्नधान्य फेकून द्यावं लागलं आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.
हेही वाचा : दर्जाहीन कामामुळे पुराचा तडाखा
“महापालिका गाळ काढण्यास मदत करणार”
“घरात पाणी शिरलेल्यांना १० हजारांची मदत तातडीनं देण्यात येणार आहे. तर, दुकानांना ५० हजार आणि हातगाडीवाल्यांनाही १० हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. महापालिका गाळ काढण्यास मदत करणार आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं.
हेही वाचा : नागपूर: लष्कर धावले मदतीला
“सगळ्या परिस्थितीकडं प्रशासनाचं लक्ष”
“चिंतेची बाब एवढीच की रात्री ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरफ, एसडीआरफ आणि लष्कराच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. सगळ्या परिस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढा आमचा प्रयत्न असणार आहे,” असं फडणवीस म्हणाले.