नागपूर: शासकीय रुग्णालयांत सामान्यांप्रमाणेच आमदार-मंत्र्यांवरही उपचार व्हावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मेडिकल रुग्णालयातील विविध कामांचे भूमिपूजन व नूतनीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, शासकीय रुग्णालयांत सामान्यांप्रमाणेच आमदार-मंत्र्यांनाही उपचार मिळायला हवे. त्यासाठी रुग्णालये दर्जेदर व्हायला हवी. दिल्ली एम्सला सामान्यांसोबत लोकप्रतिनिधीही उपचाराला जातात. मेडिकलचाही त्याच धर्तीवर विकास होईल. त्यासाठी येथे आता १८२ कोटींच्या कामाला सुरुवात केली आहे. लवकरच १४२ कोटींच्या कामाच्याही निविदा निघतील. मेयोतही लवकरच विकास होईल.
शासकीय रुग्णालयांवर प्रचंड ताण
मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात पाच लाखांहून जास्त रुग्णांवर तर आंतरुग्ण विभागात ५० हजारांवर रुग्णांवर उपचार होतात. त्यामुळे या रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. असेही फडणवीस म्हणाले. सिकलसेल मुक्त नागपूरसाठी १ लाख नागरिकांचे स्क्रिनिंग कार्यक्रम व अद्ययावत शल्यक्रियागृहाचे (ओटी) काम उल्लेखनीय आहे. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिकलसेलमुक्त भारत घोषणेला बळ मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.
…तर बांधकाम खात्याला ‘इंजेक्शन’
मेडिकल रुग्णालयाला मागणीनुसार वाढीव निधी दिला. त्यामुळे येथे दर्जेदार काम व्हायला हवे. शासकीय रुग्णालय असल्याने काहीही चालेल, असे चालणार आहे. काम दर्जेदार नसल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) वेगळेच इंजेक्शन द्यावे लागेल. मी कंत्राटदार कधी बघत नाही. परंतु शासन निधी देत असल्याने सकारात्मक परिवर्तन दिसलेच पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. येथे जिल्हाधिकाऱ्यांनीही नियमित पाहणी करून लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.