शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुमारे १० कोटींच्या खर्चातून अद्ययावत क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माध्यमातून खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाकडे मागितला आहे. हा प्रकल्प झाल्यास ते राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिले क्रीडा संकुल असेल.
राज्यात २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. त्यापैकी केवळ नागपुरातच मेडिकल आणि मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. इतरत्र केवळ एकच शासकीय महाविद्यालय आहे. निवासी डॉक्टरांसह एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांवरही कामाचा खूप ताण आहे. हे डॉक्टर निरोगी रहावे म्हणून व्यायामासह इतरही सुविधा त्यांना उपलब्ध असणे आवश्यक आहे. राज्यातील बऱ्याच महाविद्यालयांत या सोयींची वानवा आहे. परंतु, मेडिकल प्रशासनाने येथील जलतरण तलाव व जीमचे नूतनीकरण, येथील मैदानावर अद्ययावत क्रीडा संकुलच्या प्रस्तावावर काम सुरू केले आहे. त्यानुसार येथे क्रिकेटचे मैदान, त्यात सुंदर प्रेक्षक गॅलरी, फुटबाॅल व हाॅकीची सोय, अंतर्गत क्रीडा प्रकारात कॅरम, टेबल टेनिससह इतरही बरेच खेळांची सुविधा असेल. या खेळांमुळे डॉक्टर निरोगी राहण्यासह ताण-तणावापासून दूर राहण्यास मदत होणार असल्याचे मेडिकल प्रशासनाचे म्हणणे आहे.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितलेल्या ५५० कोटींच्या प्रस्तावात हाही एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्याबाबतची मंजुरी घेऊन लवकरच काम सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.” – डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल.
हेही वाचा: आमदार बच्चू कडूंनी ‘आळशी राजा’ची उपमा कोणाला दिली?; वाचा…
“राज्यात तूर्तास केवळ नागपुरातील मेडिकलमध्येच जलतरण तलाव, राष्ट्रीय स्तराचे लाँग टेनिसचे मैदान, सुंदर जीम आहे. आता क्रीडा संकुलाच्या मदतीने येथे नवीन पायाभूत सोयी मिळतील. ” – डॉ. समीर गोलावार, राज्य महासचिव, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना.