स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर लिहलेल्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचं प्रकाशन शनिवारी ( २७ मे ) नागपुरात करण्यात आलं. लेखक शुभांगी भडभडे लिखित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. “सावरकर बनण्याची तुमची औकात नाही”, असं टीकास्र फडणवीसांनी राहुल गांधींवर डागलं आहे.
“राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजेत. कारण, जेव्हा समाजाला सावरकरांचा विसर पडतोय, असं वाटतं, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात. त्यामुळे संपूर्ण समाज पेटून उठतो आणि पुन्हा एकदा सावरकरांचं विचार जनसामान्य आणि पुढील पिढीपर्यंत नेण्याची संधी आपल्याला मिळते,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
हेही वाचा : नितेश राणेंनी संजय राऊतांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला सुनील राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
“सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले, त्यांना…”
“राहुल गांधी जेव्हा ‘मी सावरकर नाही’ असं म्हणतात. तेव्हा नागपुरी भाषेत मला म्हणायची इच्छा होते, सावरकर बनण्याची तुमची औकात नाही, म्हणजेच क्षमताही नाही. सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले. पण, सावरकर अंदमानाच्या तुरुंगातील छोट्याशा खोलीत राहत आणि त्यांना खाण्यास किळसवाण्या गोष्टी मिळत. तसेच, कोल्हूचा बैल म्हणून दिवसभर श्रम केल्यावर ज्या व्यक्तीला महाकाव्य सुचते, अशा व्यक्तीचा अंदाज राहुल गांधींना येऊच शकत नाही,” असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
“राहुल गांधी जन्मात सावरकर होऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘मी सावरकर नाही’ हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो,” असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
हेही वाचा : “नव्या संसद भवनाची इमारत बांधताना कोणालाही…”, शरद पवारांचा मोदी सरकारवर आरोप
“काँग्रेसने सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी बोस यांना…”
“‘महापौर’ आणि ‘विधानमंडळ’ असे शब्द सावरकरांनी दिले आहेत. त्यामुळे एक विज्ञाननिष्ठ आणि आपल्या संस्कृतीला आव्हान देऊन चांगलं स्वीकारण्याचा आग्रह धरणारा तेजस्वी नेता म्हणून आपण सावरकरांकडं पाहिलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्याला पिढी दर पिढी पुढं पोहचवावं लागेल. कारण, काँग्रेसने सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी बोस यांना नाकारण्याचं काम केलं,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.