सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण ७ सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवण्याची ठाकरे गटाची मागणी शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) फेटाळली आहे. तसेच पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवली. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत आपलं मत व्यक्त केलं. ते शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) नागपूरमध्ये माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, राबिया प्रकरणावरील निर्णयावर पुनर्विचार व्हावा म्हणून ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे प्रकरण पाठव्याची मागणी संयुक्तिक नाही. आम्ही गुणवत्तेवर हे प्रकरण ऐकू. त्यानंतर अंतिम निर्णय द्यायचा की ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवायचं ते आम्ही ठरवू, असंही न्यायालयाने नमूद केलं.”
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वेळकाढूपणा करण्यासाठी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी”
“आम्हालाही वाटत होतं की, उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढूपणा करण्यासाठी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी करत आहे. वर्षभर निकालच लागू नये हे त्यांचं वेळकाढूपणाचं धोरण होतं. त्याच धर्तीवर हा निकाल आला आहे. आता यावर नियमित सुनावणी होऊन अंतिम निर्णय लागेल,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.
“मला तुरुंगात जीवे मारण्याचा कट होता”, राऊतांच्या आरोपावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
“मला तुरुंगात जीवे मारण्याचा कट होता”, या संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊत काहीही आरोप करू शकतात. संजय राऊत दिवसातून तीनवेळा आरोप करतात. सकाळी कोणता आरोप केला हे त्यांच्या संध्याकाळी लक्षात राहत नाही. त्यामुळे त्यावर मी काय उत्तर देणार आहे.”