नागपूर : मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. याची मला कल्पना आहे. मात्र त्या सर्वाना माझे एवढेच सांगणे आहे की मी गृहमंत्री राहणार आहे. जे लोक बेकादेशीर काम करतील त्यांना मी सोडणार नाही, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. फडणवीस शनिवारी नागपुरात बोलत होते.

फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांना जी धमकी आली आहे त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे त्याने दारूच्या नशेत अशी धमकी दिली आहे. यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल. महाराष्ट्रात कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह विभागाचा प्रभार दिला आहे. जे जे चुकीचे काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पाच वर्षे मी काम सांभाळले आहे. मी कोणाला घाबरत नाही. जे कायदेशीर आहे, तेच करतो आणि कायद्याने वागतो असे स्पष्ट केले.

गृहखात्याचा वचक नाही का? सुप्रिया सुळे यांचा सवाल

मुंबई: लोकप्रतिनिधींना वारंवार धमक्या  देण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे, इतके गुन्हेगार निर्ढावले आहेत. मग  गृहखाते काय करते; वा त्याचा वचक, दरारा  राहिला नाही का, असा सवाल   खासदार सुप्रिया सुळे यांनी  केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे.

खासदार  संजय राऊत यांना एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही गंभीर बाब  आहे. केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती सुरक्षा द्यावी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी   आवश्यक ती कारवाई करावी,अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

Story img Loader