नागपूर : माणसाच्या शरीराची स्वच्छता आंघोळीने होईल. मात्र, मनाची स्वच्छता, शुद्धता करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारीमार्फत देशभर कार्य सुरू आहे. या ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोगी शिक्षिका -शिक्षक देशभर संस्कारी पिढया निर्माण करण्याचे कार्य करतात. याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात या संस्थेच्या कार्याचे महत्व विषद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कार्याला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला नागपूर येथील लक्ष्मीनगर, नंतर धरमपेठ त्यानंतर वसंत नगर तर आता जामठा परिसरात ‘विश्वशांती सरोवर’ हे मोठे केंद्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. नागपूर येथील ब्रह्मकुमारींच्या सुवर्ण महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित होते.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाला शपथेवर सांगूनही राज्य माहिती आयुक्त नेमण्यास दिरंगाई ; मुख्यमंत्र्यांच्या समितीला निर्णय घेण्यास वेळ नाही

भारताचे हृदय स्थान असणाऱ्या नागपूर शहरांमध्ये गेल्या ५० वर्षात प्रजापिता ब्रह्मकुमारीमार्फत संस्कारी पिढ्या निर्माण करण्याचे कार्य आमच्या भगिनीमार्फत सुरू आहे. आज जमलेल्या या गर्दीमध्ये भव्यता नाही, शुद्धता आहे, साधेपणा आहे, आमच्या मनाची स्वच्छता तुम्ही ठेवता. याचा आम्हाला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : हवामान बदल, उष्णतेच्या लाटांचा प्राण्यांवर परिणाम

जगातल्या सर्व ठिकाणी शांती नांदावी, यासाठी या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी जगभर काम करतात. शांतीकडे जाणारा मार्ग निश्चित करण्याचे काम ब्रह्मकुमारी करत आहे. जगातला अंधकार दूर करणे गरजेचे आहे अज्ञानाच्या अंधारात असल्यामुळे संघर्ष आहे. हा संघर्ष कमी करून शांती निर्माण करण्याचे पवित्र काम आपण करीत असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis said prajapita brahmakumari produces cultured generations nagpur tmb 01