नागपूर: अंबाझरी येथे राज्य शासनाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यात येईल, तसेच या जागेवरील खाजगी प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे सांगितले. फडणवीस यांच्या आश्वासनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
यावेळी कृति समितीच्या प्रमुख सरोज आगलावे, सरोज डांगे, सुगंधा खांडेकर, ज्योती आवळे ,पुष्पा बौद्ध, सुषमा कळमकर, तक्षशिला वागदरे, उषा बौद्ध,माजी प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये आदींसह आमदार विकास ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.
हेही वाचा… आता गवताळ प्रदेशातही पर्यटन होणार; राज्यातील ‘हा’ पहिलाच प्रयोग पुणे, सोलापूर जिल्ह्यात
अंबाझरी येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शासनाच्यावतीने बांधण्यात येणार असून या जागेवरील खाजगी प्रकल्प रद्द करण्यात येणार आहे. हा प्रकल्प रद्द करण्यात कोणती त्रुटी राहून नये यासाठी राज्याचे महाधिवक्ता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा… धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष रेल्वेगाड्या
या प्रकल्पाला राज्य शासनाने या आधीच स्थगिती दिली आहे. या संदर्भात लेखी आदेश जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कृती समितीला देण्यात येईल, कृती समितीतर्फे २७२ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती करण्यासाठी आपल्यामध्ये आलो असल्याचे त्यांनी सांगितले.